कोपरगाव नगर परिषदेत बेमुदत कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:23 IST2021-02-11T04:23:16+5:302021-02-11T04:23:16+5:30

कोपरगाव : येथील नगर परिषदेचे पदाधिकारी, महिला नगरसेविकांचे पती व काही नगरसेवक यांचा सतत कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप होत असून, ...

Indefinite strike in Kopargaon Municipal Council | कोपरगाव नगर परिषदेत बेमुदत कामबंद आंदोलन

कोपरगाव नगर परिषदेत बेमुदत कामबंद आंदोलन

कोपरगाव : येथील नगर परिषदेचे पदाधिकारी, महिला नगरसेविकांचे पती व काही नगरसेवक यांचा सतत कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप होत असून, हे पदाधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. त्यामुळे नगर परिषद कार्यालयात भीतीचे वातावरण तयार झाले असून, १९०पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. १०) सायंकाळपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. या संदर्भात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनानुसार, बुधवारी एका नगरसेवकाने एका अधिकाऱ्याला अरेरावीची भाषा वापरली तसेच अपमानास्पद वागणूक दिली. नगर परिषदेच्या कामकाजाची एक प्रक्रिया असते. प्रत्येक कामकाज पारदर्शीपणे राबविले जाते. परंतु, काही नगरसेवकांनी प्रत्येक विभागाला दमदाटी करून कामे करून घेण्याचा पायंडाच पाडला आहे. यातून महिला अधिकार्‍यांनाही हीनतेची व अपमानास्पद वागणूक दिली जाते. काही नगरसेवक तर आमच्यावर गुन्हे दाखल आहेत, आम्ही काहीही करू शकतो, अशा धमक्या देतात. या दमदाटीला प्रत्येक अधिकारी, कर्मचारी वैतागला आहे. त्यामुळे नगरसेवकांकडून जोपर्यंत सन्मानाची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत नगर परिषदेचे कामकाज कामबंद आंदोलन करून बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर सुनील गोर्डे, ज्ञानेश्वर चाकणे, दीपक बडमजूर, पल्लवी सूर्यवंशी, योगेश्वर खैरे, रणधीर तांबे, रितेश मिरीकर, गणी पठाण, मनोज लोट, पवन हाडा, एकनाथ डाके, संभाजी कवले, रवींद्र दिनकर, भालचंद्र उंबर्जे, योगेश कोपरे, तुषार नालकर, सुनील आरण, ऋतुजा पाटील, अरुण घाडगे, श्वेता शिंदे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

Web Title: Indefinite strike in Kopargaon Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.