विमा हप्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांचा खिसा कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:57+5:302021-07-27T04:21:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्य शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘ विमा छत्र ’ योजनेच्या ...

विमा हप्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांचा खिसा कापला
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : राज्य शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या ‘ विमा छत्र ’ योजनेच्या वाढलेल्या हप्त्यामुळे आणि तो हप्ता स्वत: भरावा लागत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा खिसा कापला जाणार आहे. वर्षभरात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर हा विमा काढणे सक्तीचे करण्यात आले आहे.
सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना २०१४ पासून वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी विमा छत्र योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचे दरवर्षी नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार वित्त विभागाने १६ जुलै २०२१ रोजी आदेश काढून विमा हप्त्याचे सुधारित दर जाहीर केले आहेत. १ जुलै २०२१ ते ३० जून २०२२ या कालावधीसाठी हे दर लागू असतील. न्यू इंडिया इन्शुरन्स को-ऑप. कंपनी लि. मार्फत राबविल्या जाणाऱ्या या ग्रुप विमा योजनेचे हप्ते दरवर्षी वाढत आहेत. या योजनेचा विमा हप्ता बाजारभावापेक्षा कमी व वाजवी असावा. विमा हप्त्याची रक्कम निम्मी करण्याची मागणी निवृत्त अधिकारी, कर्मचारी व संघटनांचे प्रतिनिधी करीत आहेत.
----------
असे वाढले हप्त्याचे दर
वर्ष १० लाख विमा ५ लाख विमा
२०१७ २३००० १६८००
२०१८ ३९००० २१८००
२०१९ ७१३०० ३२४५०
२०२० ७८५२९ ३५६९५
२०२१ ९१०३० ४७६१०
---------------------
सरकारने सेवेतील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनातून ३ टक्के रक्कम काढून घ्यावी आणि कर्मचाऱ्यासह त्याच्या जोडीदाराला मरेपर्यंत आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत. केंद्र सरकारप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीच्या वेळी एक निश्चित रक्कम घेऊन सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्याच्या जोडीदाराचा औषधोपचारांसह सर्व खर्च मरेपर्यंत करावा.
- जयप्रकाश संचेती, निवृत्त अभियंता, अहमदनगर
--------------
अशा आहेत त्रुटी
सेवेमधील कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम पॉलिसीचा हप्ता कर्मचारी भरतात. तो सरकारने भरावा. सेवेतील कर्मचारी अविवाहित असताना त्याला फक्त स्वत:चा विमा काढता येतो, परंतु त्याने विवाह केला की त्याला १ अधिक ३ (स्वत:, पत्नी, २ मुले) असा चार जणांचा विमा घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. सेवेतील व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एकट्याची विम्याची रक्कम जास्त आकारली असल्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
----------
कंपनी म्हणते फायद्याचे
बाजारभावाच्या तुलनेत विमा हप्त्याची रक्कम योग्य आहे. ६० वर्षांवरील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे जीवन आरोग्यदृष्ट्या जास्त धोक्याचे (रिस्की) असते. प्रत्यक्षात वैद्यकीय खर्च मोठा असतो. त्यातुलनेत विम्याची रक्कम अल्प आहे. पहिल्या दिवसापासून विमा योजना लागू होते, त्यामुळे ही योजना व एकरकमी हप्ता फायद्याचे असल्याचे संबंधित विमा कंपन्यांच्या सूत्रांनी सांगितले.