नगर तालुक्यात आधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:49+5:302021-06-24T04:15:49+5:30
केडगाव : वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी नगर तालुक्यातील बहुतांशी गावांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून ...

नगर तालुक्यात आधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित
केडगाव : वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी नगर तालुक्यातील बहुतांशी गावांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून आधुनिक पद्धतीची ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार असून, यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत गावातील शेकडो मोबाईल एकाच वेळी खणाणणार आहेत. त्यातून सर्व ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीची माहिती होऊन तत्काळ मदत मिळणार आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून नगर तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांची नुकतीच बैठक झाली. यामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अत्यंत कमी खर्चात ही यंत्रणा गावांमध्ये कार्यान्वित होत असल्याने तालुक्यातील बहुतांशी गावांनी ही यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. दरोडा, वाहनचोरी, रस्ता लूट, महिला व लहान मुलांसंदर्भातील गुन्हे, अपघात, वन्यप्राण्यांचा हल्ला तसेच गावाला सतर्कतेचा इशारा यांची माहिती एका टोल फ्री क्रमांकावर यंत्रणेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना एकाचवेळी मिळणार आहे.
तालुक्यात ही यंत्रणा अनेक दिवसांपासून आदर्श गाव हिवरे बाजार येथे वापरात आहे. मागील आठवड्यात मांजरसुंबा येथे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच बहिरवाडी गावात यंत्रणेची ट्रायल झाली असून, लवकरच ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. जेऊर, इमामपूर, ससेवाडी व तालुक्यातील बहुतांशी गावांनी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
----
एका घटनेचा एकच संदेश
ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत एखाद्या आपत्कालीन घटनेचा संदेश एकदाच वितरित होत आहे. त्यामुळे एखाद्या घटनेबाबत कितीही नागरिकांनी फोन केला तरी नागरिकांना विनाकारण वारंवार कॉल जात नसल्याने मनस्ताप होत नाही.
---
ग्रामसुरक्षा यंत्रणा सर्व ग्रामस्थांना आपत्कालीन घटनेची माहिती देत असल्याने तत्काळ मदत मिळत असते. ज्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित आहे, तेथे गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. तालुक्यातील यंत्रणा प्रत्येक गावात कार्यान्वित झाल्यानंतर गुन्हेगारांची संख्या निश्चित कमी होणार आहे.
-युवराज आठरे,
सहायक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी, पोलीस ठाणे