कोरोना उपाययोजनांविषयी साईबाबा संस्थानला तत्काळ सूचना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:21 IST2021-04-23T04:21:48+5:302021-04-23T04:21:48+5:30
कोपरगाव : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने साईबाबा संस्थानला कोविड हॉस्पिटल तयार करणे, ऑक्सिजन प्रकल्प उभारणे, नवीन डॉक्टर व परिचारिका ...

कोरोना उपाययोजनांविषयी साईबाबा संस्थानला तत्काळ सूचना करा
कोपरगाव : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने साईबाबा संस्थानला कोविड हॉस्पिटल तयार करणे, ऑक्सिजन प्रकल्प उभारणे, नवीन डॉक्टर व परिचारिका भरती करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार याची तत्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना कराव्यात, अशी मागणी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देत केली आहे.
काळे यांनी म्हटले आहे, सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढला आहे. उत्तर अहमदनगर जिल्ह्यात शासनाची हॉस्पिटल कमी पडत आहेत. गोरगरीब जनतेला खासगी रुग्णालयाची बिले व औषधोपचार परवडत नाही. साईबाबा विश्वस्त संस्थानच्या गावाच्या बाहेर असलेल्या साई आश्रम २ मध्ये जवळजवळ १ हजार रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. परिसर हवेशीर आहे दवाखान्यासाठी उपयुक्त आहे. शहराला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकणार नाही. शिर्डी नगरी सुरक्षित राहील. साईनाथ रुग्णालयासोबतच साईआश्रमला आणखी दोन ऑक्सिजन प्लान्ट बसवून जवळजवळ ९०० ऑक्सिजन बेड युद्ध पातळीवर तयार ठेवावेत. संस्थानच्या रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर सिव्हिल सर्जन दर्जाचा अधिकारी नेमून आपत्ती व्यवस्थापनास हातभार लावावा. ३०० बेड क्षमतेचे तीन ऑक्सिजन प्लान्ट युद्धपातळीवर उभारावे.
शासकीय रुग्णालयात जर काही अतिरिक्त स्टाफ असेल तर तो येथे पाठवावा. परिसरातील खासगी डॉक्टर सेवा अधिग्रहित करावी. त्यांना योग्य तो मोबदला मानधन द्यावे. साईआश्रमच्या सर्व इमारतींना ऑक्सिजन पाईपलाईन फिरवावी. साईबाबा संस्थानने सर्व रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करावी. तसेच ज्यांची बिल भरण्याची क्षमता आहे. पण त्यांना स्पेशल सुविधा पाहिजे त्यांचेसाठी द्वारावती भक्त निवासदेखील कोविड हॉस्पिटलमध्ये परिवर्तित करावे.