दगडी पाटा डोक्यात घालून पतीनं केली पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 12:22 IST2018-11-12T11:06:26+5:302018-11-12T12:22:12+5:30
चारित्र्याचा संशय घेत पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

दगडी पाटा डोक्यात घालून पतीनं केली पत्नीची हत्या
अहमदनगर : चारित्र्याचा संशय घेत पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दगडी पाटा डोक्यात घालून पतीनं पत्नीची हत्या केली आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे-बाळेश्वर भागातील ही धक्कादायक घटना आहे. सोमवारी (12 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात संबंधीतावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळे बाळेश्वर येथे राहत्या घरात प्रकाश नामदेव धांडे (मूळचे आंबेवगण येथील रहिवासी) याने आपली पत्नी शांता प्रकाश धांडे वय (वय ३२ वर्ष) हिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. एवढंच नाही तर घरातील दगडी पाटा तिच्या डोक्यात घालून निर्घृण हत्या केली. या घटनेत शांता धांडेंचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीची हत्या करुन आरोपी प्रकाश धांडे फरार झाला. प्रकाश धांडे हा एका पोलीस हवालदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती समजताच संगमनेर उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, घारगावचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस नाईक योगेश मोहिते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेने जवळे बाळेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.