सुप्यातील रोजगारबाधितांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:21+5:302021-04-19T04:18:21+5:30
शिवभोजन थाळी ही सुप्यातील वुडलँड हॉटेलमध्ये तयार होते. तिचा लाभ पारनेरमध्ये दिला जातो. सुपा येथे मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसायिक ...

सुप्यातील रोजगारबाधितांची उपासमार
शिवभोजन थाळी ही सुप्यातील वुडलँड हॉटेलमध्ये तयार होते. तिचा लाभ पारनेरमध्ये दिला जातो. सुपा येथे मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसायिक असून त्यावर अनेक कारागीर, वेटरची रोजीरोटी अवलंबून आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व हॉटेल बंद आहेत. त्यामुळे ही सर्व गरीब मंडळी रोजगार बाधित झाले आहेत. सुप्यातील अनेक ठिकाणी घरांची, बंगल्याची व इतर इमारतींची कामे सुरू होती. त्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील परप्रांतीय कामगार तेथे ठेकेदारकडे राबत होते. परंतु, लॉकडाऊन झाले व काम बंद पडले. तसे ठेकेदाराने काम बंद ,रोजगार बंद करून टाकल्याने त्यांची चूल बंद झाली.
एमआयडीसी, नोकरी करणारी मंडळी, उद्योजक, व्यावसायिक, आर्थिकदृष्ट्या मजबुती लाभलेली मंडळी सुप्यात बरीच असल्याने त्यांच्याकडे घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांचा रोजगार बंद झाला. त्यांनाही अशा काळात उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यावर शिवभोजन थाळी सुप्यातच उपलब्ध झाली तर कुटुंबीयांची किमान उपासमार टळणार असल्याने सुप्यासह गावागावांत ही शिवभोजन थाळी योजना राबविण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सतीश म्हस्के व उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी केली आहे.
शिवभोजन थाळी ही मोफत दिली जात असून कोरोनाच्या संकटकाळात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी देण्यात येते. त्यात २ चपात्या, भाजी व वरण, भात यांचा समावेश आहे. सध्या पारनेरमध्ये २२५ शिवभोजन थाळींचे वितरण केले जाते. त्यासाठी लाभार्थ्यांचा फक्त फोटो घेतला जातो व असल्यास मोबाईल नंबर घेऊन त्यांना मोफत थाळी देण्याची व्यवस्था केली आहे.
........
गतवर्षी कोरोनाकाळात शिवभोजन थाळी पुरवण्याची सेवा सुपा येथील वुडलँड हॉटेलने केली होती.
-सुभाष लोंढे, संचालक, शिवभोजन थाळी
.........
संबंधित चालकाने तहसीलदार पारनेर यांच्याकडे अर्ज केल्यास ही योजना सुप्यात सुरू करण्याबाबत निर्णय होऊ शकेल.
- सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी