कशी होते ऑक्सिजनची निर्मिती ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:08+5:302021-04-23T04:22:08+5:30
अहमदनगर : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशभरात सध्या व्हेंटिलेटर, बेड ...

कशी होते ऑक्सिजनची निर्मिती ?
अहमदनगर : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशभरात सध्या व्हेंटिलेटर, बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा या भयंकर परिस्थितीत सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे, ऑक्सिजन (प्राणवायू) ची निर्मिती कशी केली जाते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही चेन्नई येथील ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कारखान्यात कार्यरत असणारे अंबादास भापकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी ऑक्सिजन निर्मितीची सर्व प्रक्रिया सविस्तरपणे सांगितली. अंबादास हे नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील आहेत.
........
आपणाला ऑक्सिजन निर्मिती कशी होते. यापूर्वी वातावरणातील वायू समजून घेणे गरजेचे आहे. वातावरणातील हवेत वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंचा समावेश आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंचा आपणाला उल्लेख करता येईल. पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण ७८ टक्के आहे. तसेच ऑक्सिजन २१ टक्के, आरगॉन ०.९ टक्के आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ०.०३८ टक्के आहे.
....
औद्योगिक वसाहतीमध्ये हवेवर प्रक्रिया करून हवेतून ऑक्सिजन वेगळा केला जातो. या प्रक्रियेला वायू विभाजन (फ्रॅक्शनल डिस्टिलेशन) किंवा ऑक्सिजन, नायट्रोजन सेपरेशन युनिट (ASU) म्हटले जाते. या प्रक्रियेत हवेतील वायू वेगवेगळे करण्यात येतात.
सुरुवातीच्या प्रक्रियेत प्रथम हवेतील पाण्याचे सर्व बाष्प शोषून फिल्टरमधून जाते. या प्रक्रियेत धूळ आणि इतर दूषित पदार्थ फिल्टरद्वारे काढून टाकले जातात. त्यानंतर शीतकरण प्रक्रिया सुरू होते. यात टर्बाईन्स आणि उच्च ऊर्जा रेफ्रिजरेशन सिस्टिमचा वापर केला जातो. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन आणि इतर वायू द्रवरूपात येण्यास सुरुवात होते. ऑक्सिजन उणे १८३ अंश सेल्सिअसला (-१८३) हवेतून वेगळा होऊन द्रवरूपात येतो. नायट्रोजन उणे १९६ अंश सेल्सिअसला (-१९६) द्रवरूपात येतो. द्रव रूपात आलेला ऑक्सिजन पाईपलाईनद्वारे टँकमध्ये साठवला जातो. टँकमध्ये साठवलेला ऑक्सिजन टँकरद्वारे किंवा सिलिंडरद्वारे हॉस्पिटल तसेच औद्योगिक वापरासाठी पाठवला जातो. हॉस्पिटलमध्ये द्रवाचे रुपांतर पुन्हा वायूत करावे लागते.
द्रव किंवा वायू रूपातील ऑक्सिजनचा वापर अन्न उत्पादन, औषधे आणि अवकाश अन्वेषणासह अनेक उद्योगांमध्ये केला जातो.