भयमुक्त प्रशासनाची हमी देणारे मोदी गुन्हेगारांच्या प्रचाराला कसे?

By Admin | Updated: October 11, 2014 00:12 IST2014-10-11T00:10:51+5:302014-10-11T00:12:24+5:30

शिर्डी : भ्रष्टाचार, गुन्हेगारी, भयमुक्त व स्वच्छ प्रशासनाची हमी देणारे पंतप्रधान राहुरीत गुन्हेगारांच्या प्रचाराला आलेच कसे? असा सवाल करत यामुळे मोदींनी आपल्या पदाची किंमत कमी करून घेतली,

How Modi campaigning for terrorists guarantees fearless administration? | भयमुक्त प्रशासनाची हमी देणारे मोदी गुन्हेगारांच्या प्रचाराला कसे?

भयमुक्त प्रशासनाची हमी देणारे मोदी गुन्हेगारांच्या प्रचाराला कसे?

शिर्डी : भ्रष्टाचार, गुन्हेगारी, भयमुक्त व स्वच्छ प्रशासनाची हमी देणारे पंतप्रधान राहुरीत गुन्हेगारांच्या प्रचाराला आलेच कसे? असा सवाल करत यामुळे मोदींनी आपल्या पदाची किंमत कमी करून घेतली, अशा शब्दात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टिकास्त्र सोडले़
उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी राहाता तालुक्यात ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी संपर्क प्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, खासदार सदाशिव लोखंडे,आमदार अशोक काळे, तालुका प्रमुख कमलाकर कोते, विजय काळे, सचिन कोते, नाना बावके, सभेचे आयोजक व शिर्डीचे उमेदवार अभय शेळके तसेच अकोल्याचे मधुकर तळपाडे, राहुरीच्या डॉ़ उषाताई तनपुरे, संगमनेरचे जनार्धन आहेर, श्रीरामपूरचे लहू कानडे, नेवासाचे साहेबराव घाडगे पाटील या उमेदवारांची उपस्थिती होती़
कालपर्यंत मोदींना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी प्रयत्न केले, अच्छे दिन येणार असे सांगितले, बुरे दिन असताना शिवसेना चालत होती, मात्र खुर्ची मिळताच शिवसेनेशी नातं तोडलं, केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला एक क्षणही लागणार नाही, मात्र भाजपाला सत्तेत आणण्यासाठी शिवसैनिकांनी घाम गाळला, मते दिली, आज भाजपाला लाट आली असे वाटते़
ती लाट आल्यानंतर त्यांना हिंदुत्व व जुना मित्र नकोसा झाला, अशा शब्दांत ठाकरे यांनी मोदी व भाजपावर शरसंधान साधले़ केवळ दर्शनाने छत्रपतींचे आशीर्वाद मिळणार नाहीत, कधी शिवजयंती साजरी केली का? असा सवाल उपस्थित करतानाच शिवजयंती साजरी करणारी शिवसेना ही एकमेव संघटना असून ती कधीही हिंदुत्व सोडणार नाही व महाराष्ट्राचे तुकडेही होऊ देणार नाही. आम्ही तुमच्याकडे देश सोपवला आहे, महाराष्ट्राची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले़
ठाकरे यांनी भाजपा बरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही टिकेचे लक्ष्य केले़ जिल्ह्यात तीन मंत्री असतानाही कोपरगाव-कोल्हार मार्गाची दुरवस्था असल्याचे सांगतानाच येथे हॉस्पिटल, शैक्षणिक संकुल कशी होणार? असा सवाल केला़ अडगळीत पडलेल्या विखे पिता-पुत्रांना शिवसेनाप्रमुखांनी मंत्रिपदे देऊन प्रतिष्ठा मिळवून दिली़ मात्र त्यांनी विश्वासघात केला, उद्या आमची सत्ता येताच मागील दाराने पुन्हा सेनेत येण्यासाठी प्रयत्न करतील अशी टिकाही ठाकरे यांनी केली़
भाऊसाहेब वाकचौरे यांनीही विधानसभेच्या तिकिटासाठी सेनेकडे प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट केला़ दरम्यान, या सभेसाठी प्रत्येक उमेदवाराने शक्तीप्रदर्शनाची संधी साधली. राहुरी तालुक्यातील शिवसैनिकांची संख्या लक्षणीय होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: How Modi campaigning for terrorists guarantees fearless administration?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.