उड्डाणपुलाच्या आशा पुन्हा पल्लवित

By Admin | Updated: March 9, 2016 00:30 IST2016-03-09T00:21:43+5:302016-03-09T00:30:32+5:30

अहमदनगर : राष्ट्रीय महामार्गांच्या विकासामध्येच नगर येथील नियोजित उड्डाणपुलाचा समावेश करण्यात आला असल्याने केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून उड्डाणपुलासाठी भरीव निधी मिळणार आहे.

The hopes of the flyover resumed | उड्डाणपुलाच्या आशा पुन्हा पल्लवित

उड्डाणपुलाच्या आशा पुन्हा पल्लवित

अहमदनगर : राष्ट्रीय महामार्गांच्या विकासामध्येच नगर येथील नियोजित उड्डाणपुलाचा समावेश करण्यात आला असल्याने केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून उड्डाणपुलासाठी भरीव निधी मिळणार आहे. यामुळे गेल्या सहा वर्षांपासून उत्कंठा वाढविणाऱ्या या उड्डाणपुलाबाबत नगरकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
राज्यातील आघाडी सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत नगर-पुणे या महामार्गाच्या चौपदरीकरणामध्येच उड्डाणपुलाचा समावेश केला होता. मात्र नगर येथील काही लोकप्रतिनिधींचा विरोध, भूसंपादन प्रक्रिया, तांत्रिक अडचणी आदी प्रकारे उड्डाणपुलाच्या मार्गात अनेक अडथळे आले होते. त्यामुळे सहा वर्षांमध्ये पुलाच्या अंदाजपत्रकात वाढ झाली. उड्डाणपुलासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी अनेक आंदोलने केली. तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी उड्डाणपुलासाठी परिश्रम घेतले, मात्र उड्डाणपूल हा नगरकरांसाठी स्वप्नच ठरला. दरम्यानच्या काळात नगर शहराबाहेरून दोन बाह्यवळण रस्ते झाले असल्याने शहरातील वाहतुकीचा ताण कमी झाला. त्यामुळे उड्डाणपुलाची आवश्यकता नसल्याचा युक्तीवादही अधिकारी करीत असल्याने चौपदरीकरणात समाविष्ट असलेला उड्डाणपूल बारगळला.
दरम्यान, जामखेड-उदगीर आणि नगर-मनमाड या दोन रस्त्यांना केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला. या रस्त्याच्या मजबुतीकरणामध्ये नगर शहरातील उड्डाणपुलाचा समावेश करण्यात आला. तसेच स्वस्तीक चौक ते कोठी चौकापर्यंत असलेला उड्डाणपूल नव्या आराखड्यामध्ये डीएसपी चौकापर्यंत वाढविण्यात आला. शनिवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी उड्डाणपुलाच्या साईटची पाहणी केली. तसेच दोन महिन्यांमध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती अभियंत्यांनी दिली. तसेच सहा महिन्यामध्येच उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे नगरकरांच्या उड्डाणपुलाबाबत पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The hopes of the flyover resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.