अहमदनगर : महावितरणतर्फे महाकृषी ऊर्जा अभियान राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्रीरामपूर विभागातील बेलापूर शाखा कार्यालयांतर्गत वळदगाव या गावातील शेती वस्तीवर संपूर्ण वीज बिल भरून अनेक वर्षांच्या कृषीपंप थकबाकीतून मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीचे मंगळवारी सन्मानपत्र देऊन कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
विभागातील वीज देयक थकबाकी वसुली व कृषिपंप वीज धोरण २०२० यासंदर्भात विविध कार्यांचा आढावा मंगळवारी प्रादेशिक संचालकांनी घेतला. यावेळी शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये सुभद्राबाई बाबासाहेब भोसले यांनी ३८ हजार ९६० रुपये, तसेच किशोर भाऊसाहेब भोसले यांनी ३० हजार २७० रुपये भरणा केला. प्रातिनिधिक स्वरूपात या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन कोकण प्रादेशिक संचालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्रीरामपूर विभागांतर्गत आजपर्यंत या योजनेमध्ये १५ हजार ३७७ शेतकऱ्यांकडून १५ कोटी रुपये भरणा झाला आहे. आतापर्यंत २ नवीन रोहित्रे व ५ रोहित्रांची क्षमता वाढ मंजूर झाली असून, चिंचविहिरे येथील १०० के.व्ही.ए नालकर रोहित्राचे काम पूर्ण झाले आहे, तसेच रामपूर येथील पठारे डीपी व वांबोरी येथील बोरकर डीपी यांचे क्षमतावाढीचे कामदेखील पूर्ण झाले आहे.
यावेळी अहमदनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, श्रीरामपूर विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता अमित कांबळे व नीलेश नागरे, सहायक अभियंता वैभव निकम, सरपंच अशोक भोसले, उपसरपंच रामराव शेटे व शेतकरी उपस्थित होते.
---------
फोटो ओळ : २३महावितरण
कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते श्रीरामपूर विभागातील थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे व कार्यकारी अभियंता अनिल थोरात उपस्थित होते.