उद्धव ठाकरेंचा इतिहास कच्चा

By Admin | Updated: October 9, 2014 00:11 IST2014-10-09T00:00:00+5:302014-10-09T00:11:42+5:30

अहमदनगर : शिवाजी महाराज शिवसेनेची खासगी प्रॉपर्टी नाही, असा टोला भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मारला.

History of Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा इतिहास कच्चा

उद्धव ठाकरेंचा इतिहास कच्चा

अहमदनगर : अफजलखान महाराष्ट्रात दिल्लीहून नाही तर विजापूरहून आला होता. जरा इतिहास नीट माहिती करून घ्या. आम्हाला अफजलखान म्हणता पण त्याच अफजलखानाबरोबर २५ वर्षे कसे राहिलात? शिवाजी महाराज शिवसेनेची खासगी प्रॉपर्टी नाही, असा टोला भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मारला.
वाळकी (ता.नगर) येथे श्रीगोंदा मतदारसंघाचे भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारसभेत खडसे बोलत होते. यावेळी खा.दिलीप गांधी, आ.शिवाजी कर्डिले, बाबासाहेब भोस, डी. डी. घोरपडे, कुंडलीक दरेकर, दादाभाऊ चितळकर, राजेंद्र म्हस्के आदी उपस्थित होते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाजपावर टीका करताना अफजलखान दिल्लीहून महाराष्ट्रात येत असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना खडसे म्हणाले की, जे शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागतात, त्यांना महाराजांचा इतिहासही माहिती असू नये. अफजलखान दिल्लीहून नाही तर विजापूरवरून महाराष्ट्रात आला होता आणि शिवाजी महाराज काय शिवसेनेची खासगी प्रॉपर्टी नाही. महाराजांबद्दलची अस्मिता भाजपाने जितकी जपली तितकी या देशात कुणीच जपली नाही. सहारा विमानतळाला व व्हिक्टोरिया टर्मिनसला महाराजांचे नाव तसेच संसदेच्या आवारात महाराजांचा पुतळा, महाराजांचे नाणे ही सर्व कामे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात झाली. महाराजांचा गौरव करण्यात भाजपाशिवाय दुसरा कुणी पुढे आला नाही.
खडसे पुढे म्हणाले की, कुकडीचे पाणी आम्हीच आणले. टँकरमुक्त महाराष्ट्रासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आम्हीच पूर्ण केल्या. राज्यात भाजपाचे एकट्याचे सरकार येणार असल्याने साकळाई योजनेसाठी पुढाकार घेणार आहे. पाटबंधारे मंत्री असताना मीच साकळाईचा सर्वे केला होता. त्याचे काम भाजपाचे सरकार आल्यानंतर पूर्ण करणार असल्याची घोषणा खडसे यांनी केली. यावेळी रमेश भामरे, भाऊसाहेब बोठे, दिलीप भालसिंग, उमेश कासार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: History of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.