बनावट डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुखसह त्याच्या मुलाला अटक; संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 11:40 IST2020-11-12T11:39:48+5:302020-11-12T11:40:24+5:30
अहमदनगर जिल्ह्यात गाजत असलेल्या बनावट डिझेल प्रकरणात पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने बुधवारी रात्री डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख यांना अटक केली.

बनावट डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुखसह त्याच्या मुलाला अटक; संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभर गाजत असलेल्या बनावट डिझेल प्रकरणात पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने बुधवारी रात्री डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख यांना अटक केली.
राहता तालुक्यातील लोणी परिसरातून या दोघांना रात्री ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी सकाळी या दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
नगर शहरातील जीपीओ चौकात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून बनावट डिझेल जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास शहर विभागाचे उपाधीक्षक विशाल ढुमे हे करत होते मात्र गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटले तरी तपासात प्रगती न झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे हा तपास वर्ग केला होता. तपास वर्ग झाल्यानंतर अवघ्या चार दिवसातच मिटके यांनी मुख्य सूत्रधाराला गजाआड केले. डिझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार शब्बीर आणि त्याचा मुलगा मुदस्सर असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखीही आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तसेच हे डिझेल कोठून येत होते आणि ते जिल्ह्यात कोठे-कोठे वितरित केले जात होते याचाही आता पर्दाफाश होणार आहे.