Ahmednagar: हृदयद्रावक! कारमध्ये बसत असताना ट्रकने उडवले, पत्नीसमोरच पतीचा मृत्यू
By अण्णा नवथर | Updated: October 23, 2023 23:50 IST2023-10-23T23:49:49+5:302023-10-23T23:50:17+5:30
Ahmednagar: रस्त्यात काहीवेळासाठी थांबून कारमध्ये बसत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.

Ahmednagar: हृदयद्रावक! कारमध्ये बसत असताना ट्रकने उडवले, पत्नीसमोरच पतीचा मृत्यू
- अण्णा नवथर
अहमदनगर - रस्त्यात काहीवेळासाठी थांबून कारमध्ये बसत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील इमामपूर घाटात सोमवारी (दि. २३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला. प्रदीप सखाराम खेलुरकर ( वय ६६, रा. छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
अपघात झाला, त्यावेळी त्यांच्या पत्नी, मुलगी आणि जावईही सोबत होते. एकाच कारमधून हे कुटुंब पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. काही वेळासाठी ते इमामपूर घाटात थांबले. त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले. कारचा दरवाजा उघडून बसत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने प्रदीप यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती, की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातावाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
प्रदीप खेलूरकर हे एका कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. सध्या ते वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाचे सचिव म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पत्नी निर्मला खेलूरकर एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. दरम्यान, कारला धडक देणारा ट्रक पाठलाग करत नेवासा फाटा येथे पकडला असून, याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.