गुरु:साक्षात् परब्रम्ह, तस्मै श्रीगुरुवे नम:
By Admin | Updated: July 13, 2014 00:18 IST2014-07-12T23:36:33+5:302014-07-13T00:18:30+5:30
अहमदनगर - ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून - आयुष्याला आकार देणाऱ्या शिल्पकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी गुरुपौर्णिमा शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरी झाली.
गुरु:साक्षात् परब्रम्ह, तस्मै श्रीगुरुवे नम:
अहमदनगर - ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून - आयुष्याला आकार देणाऱ्या शिल्पकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी गुरुपौर्णिमा शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पारनेरमध्ये गुरूपौर्णिमा
पारनेर : येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे गुरूपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी गुरूंना वंदन करून गौरव केला. आनंद सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ.सादीक राजे, सागरीका प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्माकर भालेकर यांच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अण्णासाहेब औटी, बाळासाहेब पठारे, रमेश औटी, प्राचार्य उषा रोहोकले, उपमुख्याध्यापक कोवाष्टे,पर्यवेक्षक कोतकर आदी हजर होते. मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल पद्माकर भालेकर, तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बापूराव होळकर यांचा गौरव करण्यात आला. पारनेर येथे पूर्णवाद परिवाराचे प.पू.विष्णू महाराज पारनेरकर यांचे सायंकाळी पूजन करण्यात आले. यावेळी देशभरातून हजारो शिष्य परिवार हजर होता. पूर्णवाद युवा फोरम च्यावतीने तीन दिवस गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते. पारनेर येथील आनंद परिवाराचे रामचंद्र महाराज कांबळे यांचे पूजन परिवाराने केले. वनकुटे येथे वै. ह.भ.प. नाना महाराज वनकुटेकर यांच्या शिष्य परिवाराने गुरूपौर्णिमा उत्सव साजरा केला.
देवगडला भाविकांची गर्दी
नेवासा : तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे गुरुवर्य किसनगिरी बाबांच्या समाधीला महाभिषेक करण्यात आला. संत वाड:मयाच्या चिंतनाने न्हावून निघणे हेच खरे गुरुपूजन आहे. गुरुंविषयी असलेली श्रध्दा व भक्तीभाव शेवटच्या श्वासापर्यंत जपा, असे आवाहन गुरुवर्य हभप भास्करगिरी महाराज यांनी केले. यावेळी जि. प. अध्यक्ष विठ्ठल लंघे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, सरुबाई पेसाडे तसेच इतर मान्यवर, भाविक हजर होते.
जवळे येथे गुरुपौर्णिमा
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका हिराबाई देशमुख यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगितले. स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र पारायण, अभिषेक, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री धर्मनाथ विद्यालयात शाळा समिती अध्यक्ष शिवाजी जयवंत सालके, प्राचार्य व्यवहारे, निवृत्त शिक्षक शिवाजी सालके तसेच इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सोनईत कार्यक्रम
सोनई : येथील मुळा पब्लिक स्कूल व यश अकॅडमी सीबीएसई स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. ‘गुरु शिष्याचे नाते व गुरुंनी शिष्यासाठी केलेले कार्य’ या विषयावर विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त करुन नाट्य सादर केले. राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू महेश शिंदे, किशोर बोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
शेवगाव-वरुर दिंडी
शेवगाव : शेवगावसह तालुक्यात गुरुपौर्णिमा विविध कार्यक्रम व उपक्रमांनी साजरी झाली. वैशंपायन नगरमधील श्री दत्त देवस्थान येथे प.पू.दादाजींच्या पादुकांना रुद्राभिषेक करण्यात आला. धाकटी पंढरी असलेल्या वरुर बुद्रुक येथील आषाढी एकादशीच्या उत्सवाची गुरुपौर्णिमेने सांगता झाली. आबासाहेब काकडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रेसीडेन्सीअल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन अभिवादन केले. बाळासाहेब भारदे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेवगाव-वरुर दिंडीचे आयोजन केले होते.
कर्जत तालुक्यात
धार्मिक कार्यक्रम
कुळधरण : कर्जत तालुक्यातील विविध भागात गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचन, कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तळवडी येथे श्री दत्त देवस्थान येथे गोरक्ष महाराज शिंदे यांच्यावतीने व्यासपुजेचा कार्यक्रम झाला. खेड येथील गुप्तनाथ मंदिरात सतीश महाराज मोरे यांचे कीर्तन झाले. लोकनायक विद्यालयातील काही सेवकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. वायसेवाडी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात संजय महाराज मंदिरात संजय महाराज सायकर यांचे कीर्तन झाले.
गुरु-शिष्याचा संवाद
तिसगाव : श्रीगुरु प्रतिमा पूजन, पादुका अभिषेक, गुरु गीतेचे सार्वत्रिक वाचन, महाआरती अशा धार्मिक विधीच्या जोडीला गुरु-शिष्यांच्या सार्वत्रिक संवादाने श्री क्षेत्र हनुमान टाकळीे ता. पाथर्डी येथील गुरुपौर्णिमा उत्सवात रंगत आली. सद्गुरुबद्दलचे अनुभव सांगताना भाविकांच्या उमाळ्यांनी स्नेह स्पर्शाचा ओलावा निर्माण झाला. जाणीवांच्या त्रुटींचा अभ्यास आपणच आपल्या मनाशी संवाद साधायचा असतो. आणि आपल्या मनाशी संवाद करणारा शिष्य श्रेष्ठ असतो, असे माधवस्वामी म्हणाले. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, संत मोरेश्वर यांच्या चरित्र आठवणी विस्तार संदर्भाने हा संवाद उत्तरोत्तर रंगला.