अपुऱ्या पटसंख्येमुळे बंद होण्याच्या मार्गावरील शाळेला ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:53+5:302021-07-18T04:15:53+5:30
देवदैठण : अपुऱ्या पटसंख्येमुळे बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या देवदैठण केंद्रातील अलभरमळा प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्याने ‘अच्छे दिन’ आले ...

अपुऱ्या पटसंख्येमुळे बंद होण्याच्या मार्गावरील शाळेला ‘अच्छे दिन’
देवदैठण : अपुऱ्या पटसंख्येमुळे बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या देवदैठण केंद्रातील अलभरमळा प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या वाढल्याने ‘अच्छे दिन’ आले आहेत. येथील पटसंख्या आता तीनवरून २२वर पोहोचली आहे.
अलभर मळा, साठे मळा, कोकाटे मळा, साकळाई मळा व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी १९६० साली ही वस्तीशाळा स्थापन झाली होती. पटसंख्या अवघी तीन झाल्याने शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याच्या यादीत या शाळेचे नाव होते. २०१७ साली शिक्षक प्रकाश जंबे व त्यानंतर २०१८ साली बदलून आलेल्या शिक्षिका कांता पठारे यांनी सर्व सोयीयुक्त असणारी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडू नये, ती सुरूच रहावी यासाठी धडपड सुरू केली.
परिसरातील विद्यार्थी शाळा बंद होणार म्हणून इतर शाळेत तर काहींनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला होता. शिक्षक प्रकाश जंबे व कांता पठारे यांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी पालकांचे प्रबोधन केले. त्यानंतर जून २०१८ ला चार नवीन विद्यार्थी दाखल झाल्याने विद्यार्थी संख्या ७ झाली. पुढच्या वर्षी पुन्हा पालकांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर जून २०१९ ला विद्यार्थी संख्या ९ झाली. मात्र विद्यार्थी संख्या वाढविणे आवश्यक होते. कारण शाळा बंद पडण्याचा धोका टळलेला नव्हता व पुन्हा यादीत नाव आले. त्यानंतर या शिक्षकांनी वीटभट्टीवर भेट देऊन शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याची मोहीम हाती घेतली. त्यात चार मुले शाळाबाह्य आढळली. शाळा लांब असल्याने ही मुले शाळेत जात नव्हती. अशावेळी या शिक्षकांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या या मुलांना शाळेत दाखल करून स्वतःच्या चारचाकी वाहनातून ५ कि. मी. असलेल्या शाळेत नेण्यास सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थी संख्या १३ झाली. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष दिले.
तसेच शाळेत ई लर्निंग, बोलक्या भिंतींसह विविध उपक्रम राबविले. त्यामुळे पालकांचा शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल विश्वास वाढला. त्यामुळे पटसंख्या जून २०२० ला १७ झाली होती.
गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे, केंद्रप्रमुख बबन वेताळ, पं.स. सदस्या कल्याणी लोखंडे, सरपंच जयश्री गुंजाळ, उपसरपंच पूजा बनकर, उद्योजक वसंत बनकर, सदस्य नीलेश गायकवाड, अनिल बनकर, पालकांनी शिक्षकांचे कौतुक केले आहे.
----
लॉकडाऊनमधील उपक्रमांचा फायदा..
लॉकडाऊन काळातील ऑनलाइन शिक्षण, गृहभेटी, गटशाळेच्या माध्यमातून दिलेले शिक्षण यामुळे बाहेर इतरत्र प्रवेश घेणारे तसेच इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात या शाळेत प्रवेशित झाले. यामुळे विद्यार्थी संख्या थेट २२वर जाऊन पोहोचली. त्यामुळे अलभरमळा शाळेतील शिक्षकांनी गुणवत्तेच्या जोरावर बंद पडणाऱ्या शाळेला अच्छे दिन आणले आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बजरंग साठे, उपाध्यक्ष स्वाती साठे, पवन अलभर, दादा साठे, काशिनाथ अलभर, संदीप अलभर, बाळासाहेब अलभर, दत्ता साठे व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
----
फोटो आहे
160721\5425img_20210715_162941.jpg
फोटो ओळी
श्रीगोंदा तालुक्यातील अलभरमळा शाळेची पटसंख्या वाढल्याने केंद्रप्रमुख व पालकांनी शाळेला भेट देऊन कौतुक केले . ( छायाचित्र -संदीप घावटे )