बँकेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:50+5:302021-06-24T04:15:50+5:30
अर्बन बँकेच्या शेवगाव या तालुका पातळीवरील शाखेतून मोठ्या प्रमाणावर सोनेतारण कर्ज वाटप झाले. मात्र, या कर्जाचा भरणाच केला गेला ...

बँकेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
अर्बन बँकेच्या शेवगाव या तालुका पातळीवरील शाखेतून मोठ्या प्रमाणावर सोनेतारण कर्ज वाटप झाले. मात्र, या कर्जाचा भरणाच केला गेला नाही. त्यामुळे बुधवारी बँकेच्या नगर येथील मुख्यालयात या सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता. या लिलावात सहभाग घेण्यासाठी मोठ्या संख्येने सराफ जमले होते. सोन्याच्या ३६४ पिशव्यांचा लिलाव होता. मात्र, पहिल्या पाच पिशव्या उघडताच त्यात सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने निघाले. या प्रकाराने सराफ व नागरिक हादरले. त्यानंतर लिलावाची प्रक्रिया लगेच थांबविण्यात आली. या पाच पिशव्यांमध्ये किती सोने होते, त्यापोटी किती कर्ज दिले, उर्वरित पिशव्यांत किती सोने आहे, हा काहीही तपशील बॅँकेच्या प्रशासकांनी उघड केलेला नाही. ही रक्कम कोट्यवधीच्या घरात असल्याचे बँक बचाव समितीचे म्हणणे आहे.
---------------------
शाखाधिकाऱ्यांनी दिली होती कल्पना
अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे शाखाधिकारी यांनी बँक प्रशासनाला पत्र देऊन शाखेत २०१८ पासून संशयास्पद सोने तारण व्यवहार होत असल्याची कल्पना दिली होती. मात्र, संचालक मंडळ व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर काहीच कार्यवाही केली नसल्याचे बँकेचे सभासद राजेंद्र गांधी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
----------------
प्रशासक गेले बँक सोडून
अर्बन बँकेचा तोटा १०० कोटींच्या पुढे गेला असून बँकेचा एनपीएही वाढून तो ७० टक्क्यांवर गेला आहे. याबाबत बँक बचाव कृती समितीने बुधवारी प्रशासक महेंद्र कुमार रेखी यांना जाब विचारला. गोंधळ वाढल्याने बँकेत पोलीस बंदोबस्त बोलवावा लागला. बँक बचाव कृती समितीचे सदस्य राजेंद्र गांधी, पोपट लोढा, अनिल गट्टाणी, ऋषिकेश आगरकर, अच्युत पिंगळे, प्रमोद मोहळे, धोंडोपंत कुलकर्णी यांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केल्याने प्रशासक बँक सोडून निघून गेले.
--------------------
बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट आढळले आहे. पंचनामा झाल्यानंतर तपशील दिला जाईल. दोषींवर गुन्हे दाखल केले जातील. बँकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून तातडीने कर्ज वसुली सुरू करण्यात आलेली आहे.
- महेंद्र कुमार रेखी, प्रशासक, नगर अर्बन बँक
..............
फोटोओळ (२३ अर्बन बँक )
अहमदनगर शहरात बुधवारी अर्बन बँकेत सभासदांनी प्रशासक महेंद्र कुमार रेखी यांना त्यांच्या दालनात जाऊन बँकेच्या ढासळत्या कारभाराबाबत जाब विचारला.