सत्ता द्या, शेतमालाला भाव देतो
By Admin | Updated: October 11, 2014 00:10 IST2014-10-11T00:07:49+5:302014-10-11T00:10:55+5:30
पाथर्डी : बदल घडवायचा नसेल तर असेच रहा असे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत़

सत्ता द्या, शेतमालाला भाव देतो
पाथर्डी : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, भाजपा केवळ स्वार्थासाठी भांडत असून, त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही़ या स्वार्थातूनच त्यांनी युती आणि आघाडी तोडली़ असे सांगत माझ्या हातात सत्ता द्या तुम्ही जो ठरवाल तो दर तुमच्या शेतमालाला देईन,असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले़ तसेच बदल घडवायचा नसेल तर असेच रहा असे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत़
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देविदास खेडकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी शहरातील वीर सावरकर मैदानात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी देविदास खेडकर, नेवासा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप मोटे, पारनेरचे मोहन रांधवण, बीडचे सुनील धांडे, माजी आ. जयप्रकाश बावीस्कर, राज्य उपाध्यक्ष गणेश महाले, कैलास गिरवले,गणेश भोसलेआदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की,देशाला स्वातंत्र मिळून ६७ वर्षे झाली मात्र, आजही तेच ते प्रश्न आहेत प्रत्येक निवडणुकीत हे देऊ ते देऊ असे सांगितले जाते प्रत्यक्षात काहीच मिळत नाही़ जनताही केवळ आश्वासन देणाऱ्यांनाच मते देते़ तेच ते चेहरे निवडून येतात़ त्यामुळे काहीच फरक पडत नाही़ तुमच्यासारखेच तुमचे आमदार आणि खासदार जशी राजा तशी प्रजा की जशी प्रजा तसा राजा हे काही मला कळत नाही असे सांगत ठाकरे म्हणाले़ आतापर्यंत महाराष्ट्रातील साठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी अजित पवार काय बोलतात? असा सवाल त्यांनी केला़
बदल घडवायचा नसेल तर मग निवडणुका कशासाठी आणि ही स्टंटबाजी कशासाठी़ राज्यात नवीन बाबी साकारण्याचे मी स्वप्न पाहिले असून, एक वेगळा प्रयोग करण्यासाठी मी तयार आहे तुमची साथ मिळाली तर ते शक्य होईल अशक्य असे काहीच नाही.
मला प्रॉपर्टी कमवायची नाही,कारखाने काढायचे नाही, राजकीय अड्डे तयार करण्यासाठी काही करायचे नाही़ ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहराकडे वळत आहे़ त्यांना मात्र नोकऱ्या मिळत नाही़ राज्यातील शेतजमीन युरोपसारखी आहे़ परंतु त्याचा काही उपयोग नाही़ शेतकरी आत्महत्या करतात याला सत्ताधारी जबाबदार आहेत़
(तालुका प्रतिनिधी)