आयाराम, गयाराम संस्कृतीला मूठमाती द्या

By Admin | Updated: October 10, 2014 00:23 IST2014-10-10T00:22:04+5:302014-10-10T00:23:37+5:30

नेवासा : जिल्ह्यातील दलबदलू नेत्यांना धडा शिकवा, असे आवाहनआर.आर पाटील यांनी गुरुवारी जाहीर सभेत बोलताना केले.

Give Aamraam, Gauram culture a bunny | आयाराम, गयाराम संस्कृतीला मूठमाती द्या

आयाराम, गयाराम संस्कृतीला मूठमाती द्या

नेवासा : ज्यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता मिळवून मोठेपणा मिरवला, त्यांनी माकडउड्या मारून दलबदलूपणा केला आहे. त्यामुळे त्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. ज्यांनी पक्षाबद्दल निष्ठा पातळ केल्या. त्यांना मतदार कधीच थारा देणार नाही. आयाराम, गयाराम संस्कृतीला मूठमाती देण्यासाठी जिल्ह्यातील दलबदलू नेत्यांना धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आर.आर पाटील यांनी गुरुवारी कुकाणा येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले.
नेवासा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ कुकाणा येथे आयोजित सभेत आर. आर. पाटील बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आर.आर. पाटील म्हणाले की, सोशल माध्यम, टीव्ही व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन मते मिळविण्यात यशस्वी ठरले. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर गॅस, डिझेल, पेट्रोल, खते, सिमेंट, औषध यांचे दर वाढविले. कांद्याचे दर निम्म्याने खाली आले. कापूस उत्पादक अडचणीत आणला. साखर निर्यात बंद केली त्यामुळे केंद्रातील भाजपाचे सरकार हे उद्योगपतींना पाठीशी घालणारे व शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे सरकार ठरले असल्याची टीका त्यांनी केली.
भाजपाचे गडकरी, फडणवीस म्हणतात विदर्भ वेगळा करू, ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ जणांनी हौतात्म्य पत्करले, त्या महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणाऱ्यांना सत्ता तुम्ही देणार आहात का? असा सवाल त्यांनी केला.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांना गुजरातमध्ये उद्योग आणण्याचे आवाहन केले, असे झाल्यास आनंदीबेन यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा देऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे राज्यातील १२ कोटी जनताच ठरवील ते अहमदाबादमध्ये बसून ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपला महाराष्ट्र हा ज्यांनी साधुसंताना त्रास दिला त्यांच्या विचाराने नव्हे तर साधुसंत व समाज सुधारकाच्या विचारानेच पुढे जाईल. या अपप्रवृत्तींना महाराष्ट्रातील पुरोगामी जनता जागा दाखवतील. बहुजन समाजाला लुटण्याचे काम करणारे महाराष्ट्रातील जनतेला कधीच न्याय देऊ शकणार नसल्याने अशा प्रवृत्तींना दूर सारा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचे भाषण झाले. व्यासपीठावर सोमनाथ धूत, प्रशांत गडाख, भैयासाहेब देशमुख, डॉ.मेघाताई कांबळे, अ‍ॅड.देसाई देशमुख, अशोकशेठ मंडलीक, अशोक चौधरी, अ‍ॅड.एम.आय. पठाण, रम्हुभाई पठाण, गफुरभाई बागवान, सुनील वाघमारे, दिलीप सरोदे, महंमदभाई आतार, श्रीरंग हारदे, रामभाऊ केंदळे, भगिरथी शिंदे, निवृत्ती काळे, राजेंद्र रायकर, दौलतराव देशमुख, अशोक मिसाळ, तुकाराम मिसाळ, शंकर भारस्कर, लक्ष्मण फाटके व्यासपीठावर उपस्थित होते. अ‍ॅड. के.एच.वाखुरे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश गव्हाणे यांनी आभार मानले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Give Aamraam, Gauram culture a bunny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.