दोन महिन्यांपासून चोंभूतचे गौतमनगर अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:07+5:302021-07-23T04:14:07+5:30
अळकुटी : दोन महिन्यांपासून अंधारात असलेल्या पारनेर तालुक्यातील चोंभूत येथील गौतमनगर येथे बसविलेले रोहित्र आठवडाभरातच पुन्हा नादुरुस्त झाले. त्यामुळे ...

दोन महिन्यांपासून चोंभूतचे गौतमनगर अंधारात
अळकुटी : दोन महिन्यांपासून अंधारात असलेल्या पारनेर तालुक्यातील चोंभूत येथील गौतमनगर येथे बसविलेले रोहित्र आठवडाभरातच पुन्हा नादुरुस्त झाले. त्यामुळे हा परिसर पुन्हा अंधारात गेला आहे. नादुरुस्त रोहित्र बसविण्यास महावितरणकडून टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी येथील २५ वॅट क्षमतेचे वीज रोहित्र नादुरुस्त होऊन बंद पडले होते. त्यामुळे दोन महिन्यांपासून हा परिसर अंधारात होता. येथील ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही निघोज येथील महावितरण कार्यालयाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, १० जुलैदरम्यान बसविण्यात आलेले रोहित्र आठवडाभरातच म्हणजे १८ जुलैला बंद पडले. त्यामुळे पुन्हा परिसर अंधारात गेला आहे.
येथील रहिवासी सचिन भालेराव म्हणाले, नादुरुस्त झालेले रोहित्र नव्याने बसविण्यासाठी महावितरणच्या निघोज कार्यालयात थकीत वीजबिलांचा भरणा केलेला होता. त्यामुळे नव्याने रोहित्र बसविण्यात आले. मात्र, त्याही रोहित्रात बिघाड झाला. त्यामुळे पुन्हा एकदा वीजबिल भरण्याचा तगादा निघोज कार्यालयाकडून सुरू होत आहे. काही जण पर्यायी रोहित्राचा वापर करून विजेचा प्रश्न सोडवत आहेत. मात्र, बराचसा परिसर वीज नसल्याने अंधारातच आहे. तत्काळ रोहित्र न मिळाल्यास निघोज कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करणार आहोत, असे भालेराव यांनी सांगितले.