हिवरे बाजारचा गणेशोत्सव यंदा महिलांच्या अधिपत्याखालीच साजरा होणार; लोकमतच्या मोहिमेला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:32 IST2023-09-19T13:32:04+5:302023-09-19T13:32:13+5:30
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत निर्णय

हिवरे बाजारचा गणेशोत्सव यंदा महिलांच्या अधिपत्याखालीच साजरा होणार; लोकमतच्या मोहिमेला प्रतिसाद
अहमदनगर : आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये यावर्षीचा गणेश उत्सव सर्व घटकातील महिला मंडळ आयोजित करणार आहेत. हिवरेबाजारच्या सरपंच विमलताई ठाणगे यांनी ही माहिती दिली.
"लोकमत"ने तिचा गणपती ही मोहीम सुरू केली आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हिवरेबाजार ग्रामसभेने हा निर्णय घेतला आहे.
दहा दिवसांचा गणपती उत्सव यावर्षी आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये सर्व घटकातील महिला मंडळ पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करणार असल्याचे ग्रामसभेत ठरले. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरवात करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पत्नी सत्यभामा उर्फ तापसीबाई टिळक यांना हा उत्सव अर्पण करण्यात येणार आहे.
एक गाव एक गणपती या सार्वजनिक गणपती उत्सव उपक्रमाचे हे २८ वे वर्षे आहे. यावर्षी ग्रामपंचायत, हिवरे बाजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, ग्रामविकास तरुण मंडळ, महिला बचत गट, मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्था या सर्व घटकातील महिला आरतीसाठी सहभागी होणार आहेत. सर्व उपक्रमासाठी ग्रामविकास तरुण मंडळ सहकार्य करणार आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना तसेच ग्रामस्तरीय शासकीय कर्मचारी यांना सपत्नीक आरतीसाठी निमंत्रित केले जाणार आहे. १० दिवस महिला व मुलीसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार असून त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत.