अमरधाममध्ये पोलीस संरक्षणात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:58+5:302021-04-23T04:22:58+5:30
अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच येथील अमरधाम येथे नातेवाइकांनी गर्दी करत स्वत:च अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच ...

अमरधाममध्ये पोलीस संरक्षणात अंत्यसंस्कार
अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच येथील अमरधाम येथे नातेवाइकांनी गर्दी करत स्वत:च अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत नातेवाइकांना बाहेर काढले. त्यानंतर दोन जवळच्या नातेवाइकांच्या उपस्थित अंत्यविधी करण्यात आला.
महापालिकेच्या वतीने अमरधाम येथे कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यविधी केले जातात. गुरुवारी दुपारपर्यंत ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयातून मृतदेह अमरधाम येथे आणण्यात आले. विद्युत दाहिनीत २० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित २५ जणांवर लाकडावर अत्यंविधी करण्याची तयारी सुरू करण्यात आली; परंतु नातेवाइकांनी अमरधाममध्ये प्रवेश करत स्वत: लाकडे जमवून सरण रचविण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. तेथील कर्मचाऱ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला; परंतु कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दी पांगविली. पोलिसांची कुमूक दाखल झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण होते. नातेवाइकांना बाहेर काढून अंत्यविधीची तयारी करण्यात आली. यावेळी जवळच्या कोणत्याही दोन नातेवाइकांना अंत्यविधीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित दोन नातेवाइकांनाच फक्त अमरधाममध्ये प्रवेश देण्यात आला. प्रवेशद्वार बंद करून अंत्यविधी करण्याची वेळ व्यवस्थापनावर आली.
......
- अमरधाम येथे नातेवाइकांनी एकच गर्दी केली. काहींनी स्वत: लाकडे घेऊन अत्यंविधी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकाच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गर्दी कमी झाली. गर्दी कमी झाल्यानंतर जवळाच्या दोनच नातेवाइकांना प्रवेश देण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला.
- कर्मचारी, महापालिका