लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाच्या मृत्यूने गेल्या दोन दिवसांत उच्चांक गाठला आहे. कोरोनामुळे मंगळवारी ६५, तर बुधवारी ६० जणांचा मृत्यू झाला असून, दोन दिवसांत येथील अमरधाम येथे १२५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी दुपारनंतर जागा शिल्लक नव्हती.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा ऑक्सिजन व रेमडेसिविर उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू आहे. असे असले तरी कोरोनाचे मागील आठवड्यात सुरू झालेले मृत्यू तांडव याही आठवड्यात सुरूच आहे. सोमवारी ५६ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी हा आकडा वाढवून ६५ वर पोहोचला. दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारपर्यंत ६० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्युत दाहिनीत दिवसभरात २० जणांवर अंत्यसंस्कार होतात. उर्वरित ४० जणांवर एकाचवेळी लाकडावर अंत्यविधी केले गेले. त्यामुळे अमरधाम येथे मृतदेह ठेवायला जागा शिल्लक नव्हती. जिथे जागा मिळेल, तिथे अंत्यविधी उरकण्याची वेळ व्यवस्थापनावर आली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात १८ जणांचा मृत्यू झाला. शहरातील विविध खाजगी रुग्णालयांत ४२ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील २७ जणांचा समावेश आहे. मागील आठवड्यापर्यंत नगर शहरातील मृत्यूचे प्रमाण कमी होते. परंतु, या आठवड्यात नगर शहरातील मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे.
....
एप्रिलमधील मृत्यू
तारीख मृत्यू संख्या
१३ - ५१
१४- ४०
१५-५६
१६- ५७
१७-५२
१८-४८
१९-५३
२०-६५
२१- ६०
......
अंत्यविधीसाठी यंत्रणेची धावपळ
कोरोनाचे मृत्यू तांडव काही थांबायचे नाव घेत नाहीये. मृत्यूचा वाढता आकडा सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे. मृत्यूची संख्या वाढल्याने अंत्यविधीसाठीची यंत्रणाही कमी पडू लागली असून, यंत्रणेची धावपळ सुरू आहे.
--
फोटो