दहा हजार महिलांचा मोफत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2016 00:31 IST2016-03-09T00:20:56+5:302016-03-09T00:31:48+5:30
अहमदनगर : शहर बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांनी आज विनातिकिट प्रवास केला. शहर व परिसरातील दहा हजार महिलांनी मोफत शहर बससेवेचा लाभ घेतल्याची माहिती अभिकर्ता संस्थेचे संचालक धनंजय गाडे यांनी दिली.

दहा हजार महिलांचा मोफत प्रवास
अहमदनगर : महापालिकेच्या शहर बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांनी आज विनातिकिट प्रवास केला. शहर व परिसरातील दहा हजार महिलांनी मोफत शहर बससेवेचा लाभ घेतल्याची माहिती अभिकर्ता संस्थेचे संचालक धनंजय गाडे यांनी दिली. बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
महापौर अभिषेक कळमकर यांच्या पुढाकारातून महिला दिनी शहर बससेवा महिलांसाठी मोफत करण्यात आली होती. विळद घाट, निंबळक, भिंगार, आलमगिर, पाईपलाईन रस्ता, निर्मलनगर, सावेडी भागातील महिलांनी मोफत प्रवास सेवेचा लाभ घेतला. जागतिक महिला दिनी आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय अभिकर्ता संस्थेने घेतला होता. महापौर कळमकर यांच्या संकल्पनेतून मोफत बस प्रवासाचा निर्णय झाला. सामाजिक जाणिवेचे भान असलेल्या यशवंत अॅटो या अभिकर्ता संस्थेने महिला प्रवाशांचा सन्मान करून हा उपक्रम राबविला. व्यवस्थापक बबन घिगे, घनशाम घोलप यांनी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
शहर बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांनाही विनातिकिट प्रवास करताना महिला दिनाची प्रकर्षाने जाणीव झाली. मोफत प्रवास करता आल्याचे समाधान व्यक्त करत महिला दिनी महापालिका व अभिकर्ता संस्थेने चांगली भेट दिल्याची भावना महिला प्रवाशांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)