चारचाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू, जामखेड शहराजवळील अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 21:31 IST2025-01-15T21:30:50+5:302025-01-15T21:31:05+5:30
दुरुस्ती सुरू असलेल्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले

चारचाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू, जामखेड शहराजवळील अपघात
जामखेड (जि. अहिल्यानगर) : जामखेड नगरपरिषद हद्दीतील जामवाडी येथे चार चाकी वाहन (बोलेरो) रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडले. वाहन पाण्यात बुडाल्याने वाहनातील चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १५) सायंकाळी साडेचार वाजता घडली.
जामखेड नगरपरिषद हद्दीतील जामवाडी-जामखेड या रस्त्याने दुपारी साडेचार वाजता बोलेरो या चारचाकी वाहनाने रामहरी गंगाधर शेळके, अशोक विठ्ठल शेळके, किशोर मोहन पवार, चक्रपाणी सुनील बारस्कर येत होते. रस्त्याचे काम चालू असल्याने त्यावर खडी टाकलेली होती. वाहनचालकाला रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडले. सदर घटना रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांनी पाहिली. त्यांनी त्वरीत जामवाडी येथील ग्रामस्थांना बोलावले.
विहिरीला कठडे, पायऱ्या नव्हत्या
सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून सांगितले. माजी सरपंच कैलास माने, रमेश आजबे यांनी कठडा व पायऱ्या नसलेल्या या विहिरीत दोरखंड लावून काही युवकांना उतरवले. त्यांनी बुडालेल्या चारही युवकांना विहिरीतून बाहेर काढले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी असलेली गर्दी हटवली. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व समर्थ हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेने चारही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे चारही मृतदेह शवविच्छेदन गृहात शवविच्छेदनसाठी आणण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा पर्यंत शवविच्छेदन चालू होते.