माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 15:35 IST2021-02-10T15:34:50+5:302021-02-10T15:35:55+5:30
श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार दौलतराव मल्हारराव पवार (वय ८२, पुणतगाव, ता.नेवासा) यांचे बुधवारी दुपारी दीड वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन
श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार दौलतराव मल्हारराव पवार (वय ८२, पुणतगाव, ता.नेवासा) यांचे बुधवारी दुपारी दीड वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
पवार यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुभद्राबाई व सुधाकर, भागवत, अनिल व डॉ.शरद पवार ही चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते १९८५ मध्ये येथून विधानसभेवर निवडून गेले. मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेचे ते अध्यक्ष होते. अशोक साखर कारखान्याचेही ते काही काळ उपाध्यक्ष राहिले. विचार जागर मंचचे ते अध्यक्ष होते. पाचेगाव येथील भारत सेवा संघ या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.
श्रीरामपूर शहरात वकिली व्यवसाय करत असताना माजी खासदार गोविंदराव आदिक यांच्या संपर्कात ते आले. पुढे आदिक यांच्याच नेतृत्वाखाली दौलतराव पवार यांनी राजकीय व सामाजिक कार्यास सुरुवात केली. श्रीरामपूर नगरपालिकेत तत्कालीन नगराध्यक्ष जनार्दन टेकावडे यांच्या विरोधात माजी आमदार जयंतराव ससाणे, मधुकरराव देशमुख व अनिल कांबळे यांनी निवडणूक लढवित सत्ता परिवर्तन घडवून आणले. त्यात पवार यांनी मदत केली.
भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील हक्काचे पाणी श्रीरामपूर तालुक्याला मिळावे यासाठी त्यांनी विशेष अभ्यास करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. राज्याच्या पाणी प्रश्नावर त्यांचा मोठा अभ्यास होता. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा पवार यांच्यावर प्रभाव होता. गुरुवारी सकाळी ९ वाजता पुणतगाव येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.