मुळा नदीला पूर

By Admin | Updated: July 11, 2016 01:02 IST2016-07-11T00:46:51+5:302016-07-11T01:02:37+5:30

राहुरी/अकोले : मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे मुळा, प्रवरा नदीला पूर आला.

Flood of Mula river | मुळा नदीला पूर

मुळा नदीला पूर

राहुरी/अकोले : मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे मुळा, प्रवरा नदीला पूर आला. तब्बल ५६ हजार क्युसेक वेगाने मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होत असल्याने धरणात पाण्याची झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्री मुळा धरणात ८ हजार दशलक्ष घनफूट ( ३० टक्के) साठा झाला होता. तर भंडारदरा धरणही जवळपास ४० टक्क्यांपर्यंत पोहचले होते. नाशिक जिल्ह्यात पाऊस होत असल्याने गोदावरी नदीला देखील पूर आला होता. दारणा, गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. कुकडी पाणलोटातही जोरदार पाऊस झाला. अकोले, संगमनेर वगळता जिल्ह्यात रिमझिम पाऊस होता.
मुळा धरणाच्या पाणलोटात कोतूळ तसेच अकोले तालुक्यात शनिवारी रात्री, तसेच रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुळा नदीला पूर आला. शनिवारी सकाळी १५ हजार क्युसेकपर्यंत असणारी आवक रविवारी सकाळी थेट ४० हजारांवर गेली.
दुपारी ३ वाजता त्यात आणखी भर पडून तब्बल ५६ हजार २३० क्युसेक वेगाने मुळा वाहत होती. त्यामुळे कोतूळपासून मुळा धरणापर्यंतच्या गावांतील अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले. तसेच पारनेर व संगमनेर तालुक्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला. तसेच लहीत खुर्द येथील पूल अडीच मीटरने पाण्याखाली गेला़ त्यामुळे सायंकाळी ८ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली.
पावसाच्या सरी कोसळत असल्याने दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही़ मुळा धरणाकडे अशीच आवक सुरू राहिल्यास यंदा धरण भरण्याची चिन्हे आहेत़ सध्या लाभक्षेत्रात हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे़ त्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळेल.
संगमनेर-पारनेर तालुक्यांचा संपर्क तुटला
बोटा : जोरदार पावसाने मुळा नदीला आलेल्या पुरामुळे या नदीवरील संगमनेर-पारनेर तालुक्यांना जोडणारा साकूर परिसरातील मांडवे नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
मोसमी पावसाने पुन्हा एकदा जोर पकडल्याने अकोले तालुक्यात उगम पावणारी मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. रविवारी या नदीला पूर आल्याने पठार भागातील कोठे, आंबीखालसा, घारगाव, अकलापूर, मांडवे, साकूर परिसरातून जाणारी ही नदी पाण्याची पातळी ओलांडून वाहत होती. त्यामुळे संगमनेर-पारनेर या तालुक्यांना जोडणाऱ्या मांडवी पुलावरून रविवारी सकाळी अकराच्या सुमारास पुराचे पाणी जाण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता पाणी पातळीत वाढ झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. सायंकाळपर्यंत या पुलावरून जवळपास तीन फूट पाणी वाहत होते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घारगाव पोलिसांचे एक पथक पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, तसेच महसूलचे एक पथक पुलाजवळ तैनात होते. दरम्यान, काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने पठारभागातील घारगाव व बोटा परिसरात तसेच लगतच्या गावांमधील ओढे-नाले खळाळून वाहत होते.
ब्राम्हणवाड्यातील गावतळे भरले
ब्राह्मणवाडा : अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसराला सलग दोन दिवस मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. येथील १.८ दशलक्ष घनफूट क्षमतेचे गावतळे ओव्हरफ्लो झाले असून ९४.५८ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या बेलापूर लघुपाटबंधारे प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली आहे.
ब्राह्मणवाडा-कोतूळ मार्गावरील भोळेवाडी पुलावर पाणी आल्याने, तर रोहकडी येथे झाड पडल्याने काही तास तिन्ही बाजूंकडून ब्राह्मणवाडा गावाचा संपर्क तुटला होता.
परिसरात ७५ टक्के बटाटा लागवड व भुईमूग, सोयाबीन पेरण्या झालेल्या आहेत. सततच्या पावसाने बटाटा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुळा धरण ३० टक्के भरले : भंडारदऱ्याने ओलांडला ४० टक्केचा टप्पा

Web Title: Flood of Mula river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.