भरपावसात ठिय्या
By Admin | Updated: July 20, 2014 00:22 IST2014-07-19T23:29:13+5:302014-07-20T00:22:09+5:30
अकोले : वेळेत पाऊस न पडल्याने खरिपातील भात पिकाचे नुकसान झाले असल्याने भरपाई मिळावी, तसेच गावोगावी चारा डेपो सुरू करावेत यासह विविध मागण्यांसाठी
भरपावसात ठिय्या
अकोले : वेळेत पाऊस न पडल्याने खरिपातील भात पिकाचे नुकसान झाले असल्याने भरपाई मिळावी, तसेच गावोगावी चारा डेपो सुरू करावेत यासह विविध मागण्यांसाठी माकपने तहसील कार्यालयासमोर शनिवारी निदर्शने केली. प्रशासनाकडून ठोस उपाययोजनेचे आश्वासन न मिळाल्याने ३० आंदोलकांनी तहसील कचेरीसमोर बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस आहे, परंतु उशिरा आलेल्या पावसामुळे आता भातपीक हाती लागणार नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा. आदिवासी भागात सध्या डोंगर माथ्यावर गवत नाही. पाऊस टिकून राहिला तर नैसर्गिक चारा उपलब्ध होण्यासाठी किमान महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. सध्या चारा टंचाईचे सावट आहे. पावसाच्या सरी झेलत आंदोलक तहसील कचेरीसमोर बसून होते. आंदोलकांनी प्रशासनाशी चर्चा केली, मात्र वेळकाढूपणाची उत्तरे मिळाल्याने ३० आंदोलकांनी कचेरीसमोर बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.
जवळपास ९०० आंदोलक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केले. जनावरांची संख्या देऊन चारा मागणी अर्जही करण्यात आले आहे. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, राजाराम लहामगे, यादव नवले, नामदेव भांगरे, गणपत मधे, एकनाथ मेंगाळ, सदाशिव घोडे, बाबूराव अस्वले, गणपत थिगळे, लक्ष्मण पथवे यांची भाषणे झाली. दोन दिवसांत चारा व नुकसान भरपाई संदर्भात ठोस निर्णय न झाल्यास सोमवारी पुन्हा तहसीलवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
आंदोलकांच्या मागण्या
शासकिय अनुदानातून गावोगावी चारा डेपो व जनावरांच्या छावण्या सुरु करा. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना २ रुपये किलोने धान्य द्या, शेतीकर्ज वीज बील व शैक्षणिक फी माफ करा, अशा मागण्या घेऊन आदिवासी भागातून आलेल्या हजारो वृध्द निराधार, कष्टकरी श्रमिक शेतकरी, बांधकाम कर्मचारी व माकप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.