नेवाशात दुकानांना आग, सात दुकाने खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 22:56 IST2025-11-19T22:56:07+5:302025-11-19T22:56:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नेवासा : शहरातील नगरपंचायत चौकातील मुख्य बाजारपेठेतील सहा ते सात दुकानांना बुधवारी (दि. १९) रात्री पावणेदहा ...

नेवाशात दुकानांना आग, सात दुकाने खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
नेवासा : शहरातील नगरपंचायत चौकातील मुख्य बाजारपेठेतील सहा ते सात दुकानांना बुधवारी (दि. १९) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत सात दुकाने जळून खाक झाल्याने दुकानमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
नगरपंचायत चौकातील मुख्य बाजारपेठेतील एका दुकानास रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर काही वेळातच आगीने शेजारच्या दुकानांना कवेत घेतले. एका दुकानातील टाकीचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भीषण आगीसमोर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. नगरपंचायत प्रशासनाची अग्निशमन दलाची गाडी अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाली. मात्र, मध्येच पाणी संपल्याने आग विझवता आली नाही. त्यामुळे अग्निशमन दलाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर इतर ठिकाणच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांना येण्यास वेळ लागल्याने तोपर्यंत आगीत शेजारच्या आणखी काही दुकानांचे मोठे नुकसान झाले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. (छाया : सुहास पठाडे)