शॉर्टसर्किटनंतर आग, हॉटेल जळून खाक; नगर शहरातील घटना:
By अरुण वाघमोडे | Updated: December 25, 2023 18:44 IST2023-12-25T18:43:29+5:302023-12-25T18:44:15+5:30
माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

शॉर्टसर्किटनंतर आग, हॉटेल जळून खाक; नगर शहरातील घटना:
अहमदनगर : शहरातील माळीवाडा बसस्थानकासमोरील पंचरत्न या हॉटेलला आग लागून मोठे नुकसान झाले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून सोमवारी (दि.२५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
सोमवारी सकाळी हॉटेलच्या वरील मजल्यातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला महिती दिली. अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ हे दोन अग्निशमन बंब व पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत हॉटेलमधील फर्निचर, भांडे व इतर साहित्य खाक झाले होते.
आग लवकर आटोक्यात आल्याने शेजारील दुकानांचे नुकसान झाले नाही अथवा इतर कुठलीही हानी या घटनेत झाली नाही. दरम्यान माळीवाडा परिसरातील एका मोठ्या इमारतीला चार महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने आग लागली होती.