निमलष्करी दलाच्या दहा तुकड्या दाखल
By Admin | Updated: October 11, 2014 00:10 IST2014-10-11T00:06:25+5:302014-10-11T00:10:52+5:30
अहमदनगर : केंद्रीय निमलष्करी दलाच्या (सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस) दहा तुकड्या नगरमध्ये दाखल झाल्या आहेत.

निमलष्करी दलाच्या दहा तुकड्या दाखल
अहमदनगर : केंद्रीय निमलष्करी दलाच्या (सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस) दहा तुकड्या नगरमध्ये दाखल झाल्या आहेत. एका तुकडीमध्ये शंभर ते सव्वाशे जवान असणार आहेत. जिल्ह्यातील पोलिसांव्यतिरिक्त तब्बल अडिच हजार पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने तो नगरमध्ये दाखल होणार आहे. प्रत्येक मतदार संघासाठी एक उपअधीक्षक नियुक्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी परराज्यातील पोलीस बळ जिल्ह्यात दाखल झाले आहे. यंदा प्रथमच केंद्राचे निमलष्करी दलाला मोठ्या संख्येने पाचारण करण्यात आले आहे. गतवर्षी निमलष्करी दलाच्या चार तुकड्या जिल्ह्यात आल्या होत्या. यंदा तब्बल दहा तुकड्या नगरमध्ये दाखल झाल्या आहेत. एका तुकडीमध्ये शंभर ते सव्वाशे जवान आहेत. ते जवान कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कायदा तोडणाऱ्यांवर कारवाई करतील. याशिवाय होमगार्ड, महिला पोलीस, राज्य राखीव दलाचे जवान, फ्लायिंग स्कॉड आदी बळ तैनात करण्यात येणार आहे. निमलष्करी दलाच्या एकूण १२ तुकड्या मंजूर झाल्या आहेत, त्यापैकी १० तुकड्या दाखल झाल्या आहेत. एका तुकडीमध्ये १०० ते ११० पोलीस कर्मचारी असल्याने सुमारे दीड हजार पोलीस बंदोबस्तासाठी मिळणार आहेत, असे गौतम यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त नसलेला आणि सर्वाधिक मतदारसंघ असलेला अहमदनगर हा एकमेव जिल्हा आहे. तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्हा असल्याने अतिरिक्त पोलीस बळाची मागणी करण्यात आली होती. ती सर्व मागणी मंजूर झाल्याचे गौतम यांनी सांगितले.(प्रतिनिधी)