कोपरगाव : दारूबंदीच्या विरोधात पंचवीस वर्षे सुरू असलेल्या लढ्याला राजकीय रंग देऊन काही लोकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. काहींनी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, पोहेगावातील अवैध धंद्याविरोधात लढा चालूच ठेवणार असल्याचे शिवसेना नेते नितीन औताडे यांनी म्हटले.
औताडे म्हणाले, अनेक महिला व व्यापारी वर्गाच्या तक्रारी आल्यानंतर पुन्हा एकदा अवैध धंद्याविरोधात आवाज उठवला. अवैध धंदे करणारांनी सरपंच अमोल औताडे व औताडे कुटुंबीयांना टार्गेट केले. चुकीच्या पद्धतीने पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करत बदनामी करण्याचे षडयंत्र कोणाचे आहे, ते आता नागरिकांना कळाले आहे. अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालत आहे, याचा उलगडा झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना मदत करणे गरजेचे होते. शेवटी काय खरे आणि काय खोटे, हे जनतेपुढे येईलच. अवैध धंद्यांविरोधात पंचवीस वर्षे लढाई केली. अजूनही जर कोणी अवैध धंदे करणाऱ्यांनाच खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर या अवैध धंद्यांविरोधात जीवात जीव असेपर्यंत लढा कायम ठेवला जाईल.
सरपंच अमोल औताडे यांना भरसभेत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याला राजकीय मंडळींनी खतपाणी घातले. आमच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला खोटी फिर्याद दाखल केली. खोटी फिर्याद दाखल केल्याने गावात संवेदनशील वातावरण तयार झाले. पोलिसांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये व गावात शांतता राहावी म्हणून आम्ही पोलिसांना मदत केली. आम्हाला यात गोवण्यासाठी उच्च पातळीवरून काहींनी प्रयत्न केले रसदही पुरवली, मात्र त्यांचे मनसुबे पूर्ण झाली नाहीत.