नेवाशात एक हजार उमेदवारांचे भवितव्य होणार मतपेटीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST2021-01-15T04:19:01+5:302021-01-15T04:19:01+5:30
नेवासा : तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतमधील १०१९ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद होणार असून, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यातील ...

नेवाशात एक हजार उमेदवारांचे भवितव्य होणार मतपेटीत बंद
नेवासा : तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतमधील १०१९ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद होणार असून, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
तालुक्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ५९ पैकी ५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून, तालुक्यात एकूण १९४ केंद्रावर मतदान होणार आहे. बिनविरोध झालेल्या सदस्यांची संख्या १२३ इतकी झाली असून, खरवंडी ग्रामपंचायतीची एक जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे एकूण ५९१ पैकी ४६७ जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी १०१९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे भवितव्य मतपेटी बंद होणार आहे.
प्रशासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी सकाळी नियुक्त केलेले निवडणूक कर्मचारी व अधिकारी निवडणूक साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले.
मतदानप्रक्रियेसाठी १९४ मतदान केंद्रासाठी तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानाजवळील धान्य गुदामात बनवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये सर्व निवडणूक यंत्रे व अन्य साहित्य पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येऊन ते मतदान केंद्रात पाठविण्यात आले आहेत.
प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, चार अधिकारी, कर्मचारी तसेच एक पोलीस कर्मचारी असे १ हजार १६४ अधिकारी व कर्मचारी मतदानप्रक्रियेसाठी रवाना झाले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी गुरुवारी सायंकाळी विविध मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रावर करडी नजर ठेवण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाचे जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत.