वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST2021-03-17T04:20:53+5:302021-03-17T04:20:53+5:30
रब्बीसाठी शेतकरी कर्जबाजारी झाला. अशातच वारंवार डिझेल व पेट्रोलची दरवाढ होत असल्याने यांत्रिक शेती महागली. भाजीपाला वाहतुकीसाठीही भाडेवाढ झाली. ...

वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना
रब्बीसाठी शेतकरी कर्जबाजारी झाला. अशातच वारंवार डिझेल व पेट्रोलची दरवाढ होत असल्याने यांत्रिक शेती महागली. भाजीपाला वाहतुकीसाठीही भाडेवाढ झाली. त्यामुळे वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, भावीनिमगावसह बहुतेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना ऊस तोडणाऱ्या कामगारांना पैसे द्यावे लागत आहेत. उसालाही मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळत आहे. वीजबिलाच्या सक्तीच्या वसुलीसाठी कृषिपंपांची वीज बंद केली, म्हणून बहुसंख्य शेतकऱ्यांनी वीजबिल भरले. जायकवाडी पाणीपट्टीची वसुलीही सुरू आहे. कीटकनाशके, रासायनिक खतांच्या किमतीतही वाढ झाली आहे. घरगुती गॅसही महागला आहे. एकीकडे महागाई नव्या उंचीवर जात असताना भाजीपाल्याचे दर मात्र कोसळत आहेत. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी दिवसेंदिवस अर्थसंकटात वाढ होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
.............
पेट्रोल व डिझेल दरवाढीने ट्रॅक्टर व जेसीबी मालकांना नाइलाजास्तव मशागतीचे दर वाढवावे लागत आहेत. याचा फटका निश्चितच शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र बँक हप्ते, चालकाचा पगार व डिझेल दरवाढ पाहता ट्रॅक्टर, जेसीबी व्यवसायही अडचणींचा सामना करतोय. त्यामुळे शासनाने इंधन दरवाढ नियंत्रित करायला हवी.
- विशाल गवारे, संचालक, साईसिद्धी अर्थमुव्हर्स, शहरटाकळी