माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठसह दोघांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:53 IST2018-08-05T15:53:38+5:302018-08-05T15:53:51+5:30
मारहाण व दमदाटीप्रकरणी पाथर्डी बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांच्यासह त्यांच्या दोन भांवाना जिल्हा न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश वी़वी़ बांबर्डे यांनी हा निकाल दिला़

माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठसह दोघांना शिक्षा
अहमदनगर : मारहाण व दमदाटीप्रकरणी पाथर्डी बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांच्यासह त्यांच्या दोन भांवाना जिल्हा न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश वी़वी़ बांबर्डे यांनी हा निकाल दिला़
पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथे शहा शरीफ बाबा यात्रेत ३ एप्रिल २०१४ रोजी रात्री सलीम रज्जाक शेख व गावातील अशोक शिरसाठ यांच्यात वाद झाला़ या वादातून ४ एप्रिल २०१४ रोजी शेख यांना शिरसाठ बंधुंनी मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी गावातील गोकूळ गाडे व भुजंगराव गाडे यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी गहिनीनाथ शिरसाठ यांनी भुजंगराव गाडे यांना जिवे मारण्याची धमकी दिली़ या घटनेचा मनस्ताप सहन न झाल्याने भुजंगराव हे घटनास्थळी चक्कर येऊन पडले़ त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी गहिनीनाथ यांच्यासह अशोक जगन्नाथ शिरसाठ व राजेंद्र जगन्नाथ शिरसाठ यांच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याबाबत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़
या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासण्यात आले़ आरोपींविरोधात कलम ३२३ व ५०६ अन्वये पुरावा समोर अल्याने न्यायालयाने तिघांना कलम ३२३ प्रमाणे ६ महिने शिक्षा व ५०० रूपये दंड तसेच कलम ५०६ प्रमाणे १ वर्षे शिक्षा व ५०० दंड अशी शिक्षा ठोठावली़ या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अॅड़ पुष्पा गायके-कापसे यांनी काम पाहिले़