मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:51 IST2025-11-10T16:49:12+5:302025-11-10T16:51:15+5:30
विद्या कावरे यांना ११ मते मिळाली, तर महायुतीचे अशोक चेडेंना ६ मतेच मिळाली. यानिवडणुकीत माजी नगराध्यक्ष विजय औटींनी राष्ट्रवादीचा व्हिप धुडकावत महायुतीच्या उमेदवाराला मतदान केले.

मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
Parner Nagar Panchayat News: पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या डॉ. विद्या बाळासाहेब कावरे या बहुमताने विजय झाल्या. त्यांनी ११ विरुद्ध ६ मते मिळवत विजयाचा गुलाल उधळला. त्यांच्या विजयाने महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चपराक बसली. ११ नगरसेवकांची एकजूट कायम ठेवत खासदार नीलेश लंकेंनी आपलं वचर्स्व कायम असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते योगेश मते यांचा व्हिप धुडकावत महायुतीचे उमेदवार नगरसेवक अशोक चेडे यांच्या बाजुने मतदान केले. पण, चेंडेना पराभवाला सामोरे जावे लागले.
पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशीया यांच्या देखरेखाली सोमवारी (१० नोव्हेंबर) विशेष सभा घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते.
हात वर करून मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत डॉ. कावरे यांना ११ मते, तर विरोधी नगरसेवक अशोक चेडे यांना ६ मते मिळाली आहे.
मविआची मते एकसंध
या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकदिलाने मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली.
नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, प्रियंका औटी, निता औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या गंधाडे आणि स्वतः डॉ.विद्या कावरे सह ११ नगरसेवकांनी मतदान करून विजय निश्चित केला.
विरोधी उमेदवार अशोक चेडे यांना विजय सदाशिव औटी, युवराज पठारे, निता ठुबे, नवनाथ सोबले आणि कांताबाई ठाणगे या ६ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला.
मविआचे नगरसेवक गळाला लावण्याचे महायुतीकडून झाले प्रयत्न
महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना ‘गळाला लावण्यासाठी’ मोठआ घोडेबाजाराच्या चर्चा पारनेर शहरात जोरात रंगली होती, तरीसुद्धा आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते योगेश मते यांनी शनिवारी ९ नगरसेवकांना व्हिप बजावत डॉ. विद्या कावरे यांनाच मतदान करावे असे निर्देश दिले होते. या व्हिपचे काटेकोर पालन करत आघाडीने एकजुट दाखविली.
नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉ. विद्या कावरे यांचा नगरपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडीच्या या विजयाने पारनेरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.
खासदार लंके म्हणाले, 'हा तर निष्ठेचा विजय'
या विजयानंतर बोलताना खासदार नीलेश लंके म्हणाले, 'राजकारणात निष्ठा सर्वांत मोठी असते. लाखो रुपयांची आमिषे असतानाही आघाडीचे नगरसेवक डगमगले नाहीत, हीच खरी आमची ताकद आहे. डॉ. विद्या कावरे यांच्या विजयाने आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या विजयाची नांदी झाली आहे.'