चेकने वीज बिल; बाऊन्स झाल्यास दंड किती ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 00:27 IST2025-03-09T00:27:17+5:302025-03-09T00:27:36+5:30
धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीज बिल भरणा ग्राह्य धरला जातो.

चेकने वीज बिल; बाऊन्स झाल्यास दंड किती ?
अहिल्यानगर : वीज बिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी अनेक चेक बाऊन्स होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड आता ग्राहकांना आकारला जात आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात महावितरणला ग्राहकांकडून आलेले १६२१ चेक बाऊन्स (अनादरित) झाले आहेत.
धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात पुरेशी रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश बाऊन्स होत असल्याचे आढळून येत आहे. धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारण तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीज बिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीज बिल भरणा ग्राह्य धरला जातो.
बिल भरण्यासाठी ऑनलाइन पर्याय
महावितरणचे बिल आता ऑनलाइन भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा महावितरण मोबाइल अॅपवर ही सुविधा आहे. शिवाय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बैंकिंग, मोबाइल वॉलेट, मोबाइल बँकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्का (५०० रुपयांच्या मर्यादित) सूट देण्यात येते.
गो-ग्रीनद्वारे १२० रुपयांची सूट
महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाइन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी 'गो-ग्रीन' योजनेत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा १० रुपये सूट दिली जात आहे. त्यानुसार वर्षभराची सूट १२० रुपये होते.