निवडणुका होतात, मग कोरठण खंडोबा यात्रेवर बंदी कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:36+5:302021-01-15T04:18:36+5:30
पारनेर : एकीकडे ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या प्रमाणावर गर्दीत होत असतानाही होत आहे, तर दुसरीकडे राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या ...

निवडणुका होतात, मग कोरठण खंडोबा यात्रेवर बंदी कशासाठी?
पारनेर : एकीकडे ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या प्रमाणावर गर्दीत होत असतानाही होत आहे, तर दुसरीकडे राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबाची यात्रा रद्द करण्याच्या निर्णयास भाविकांनी जोरदार विरोध दर्शविला आहे.
राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबाचा यात्रोत्सव २८ ते ३० जानेवारी दरम्यान होणार होता. मात्र, कोरोनाचा अजूनही प्रादुर्भाव असल्याने यात्रेस परवानगी देता येणार नाही, असे पत्र प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी देवस्थानला दिले आहे. यात्रा रद्दमुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या प्रमाणावर गर्दीत होत आहे. शिर्डी येथील साई मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. असे असताना कोरठण खंडोबाची यात्रा रद्द करणे बरोबर नाही, असे भाविकांचे म्हणणे आहे.
----
कोरोनाचा जोर अजून ओसरलेला नाही. कोरठण खंडोबा यात्रेत पाच ते सात लाख भाविक येत असतात. त्यामुळे राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणेच कोरठण खंडोबा येथील यात्रेस प्रशासनने परवानगी दिलेली नाही. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठीच हा निर्णय घेतला आहे.
-सुधाकर भोसले, प्रांताधिकारी, पारनेर-श्रीगोंदा.
----
कोरोनासारख्या रोगामुळे प्रशासनाने यात्रा घेण्यासाठी परवानगी दिलेली नाही. देवस्थानने प्रशासनाच्या निर्णयानुसार यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ॲड. पांडुरंग गायकवाड,
अध्यक्ष, कोरठण खंडोबा देवस्थान,
-----
छोटे व्यायसायिक पुन्हा संकटात
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कोरठण खंडोबाची यात्रा होऊन आपल्या कुटुंबाचे आर्थिक चक्र पुन्हा सुरू होईल, असा विश्वास खेळणी, विविध वस्तू, गुडीशेव, रेवडी, खोबरे भंडाऱ्यासह अन्य वस्तू विक्री करणाऱ्या छोटे व्यावसायिकांना होता. मात्र, यात्रा रद्द झाल्यामुळे छोटे व्यावसायिक पुन्हा संकटात सापडले आहेत.