लसीचा होतोय असर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:49+5:302021-04-23T04:22:49+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त असले, तरी ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांना कोरोनापासून दिलासा मिळाला आहे. ...

लसीचा होतोय असर!
अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त असले, तरी ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांना कोरोनापासून दिलासा मिळाला आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. जरी कोरोनाबाधित झाले तरी त्यांच्यातील लक्षणे अगदी सौम्य आहेत, असे आरोग्य विभागाच्या निरीक्षणावरून समोर आले आहे.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत सव्वातीन लाखांहून अधिक लोकांनी पहिला, तर ४५ हजार लोकांनी दुसरा लसीचा डोस घेतला आहे. त्यांना कोरोनाची बाधा होत नसल्याचे समोर येत आहे.
नगर जिल्ह्यात सध्या २० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, नंतर महसूल, पोलीस, पंचायत राज, रेल्वे सुरक्षा व त्यानंतर ४५ वर्षांपुढील अनेक नागरिकांना लस देण्यात आली. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालय अशा एकूण १६५ केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे.
आतापर्यंत ३ लाख ८८ हजार ८८० नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३ लाख ३१ हजार २९७ नागरिकांनी पहिला, तर ४४ हजार ७६४ नागरिकांनी दुसरा असे एकूण ३ लाख ७६ हजार डोस नागरिकांनी आतापर्यंत घेतले आहेत. यात पहिल्या डोसची टक्केवारी ८५, तर दुसर्या डोसचे प्रमाण अकरा टक्के आहे.
आरोग्य विभागाने नोंदवलेल्या निरीक्षणाप्रमाणे ज्या लोकांनी लस घेतली आहे, त्यांना कोरोना होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. क्वचित प्रसंगी या लोकांना कोरोना झाला असला, तरी त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे असून, अनेकांवर घरीच उपचार सुरू आहेत. दवाखान्यामध्ये नेण्याची किंवा थेट आयसीयूमध्ये उपचार करण्याची गरज लसीकरण झालेल्या लोकांना पडलेली नाही. ४५ वर्षांपुढील तसेच साठ वर्षांपुढील ज्येष्ठांनाही लसीची चांगली मात्रा लागू झाली आहे. दुसरीकडे लसीकरणामुळे अनेकांमध्ये आत्मविश्वास बळावला असून, कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण आणखी कमी झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून सध्या अनेक लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी होत आहे.
१ मेपासून अठरा वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात येणार असल्याने नोंदणी करण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने आहे. नगर जिल्ह्यात अठरा वर्षांपुढील सुमारे ३० ते ३२ लाख लोकसंख्या आहे. त्यातील सव्वातीन लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित लोकांचे लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्यानुसार लसीकरण केंद्रांमध्येही वाढ करण्यात येणार आहे.
-------------
दररोज दहा ते पंधरा हजार लोकांचे लसीकरण
नगर जिल्ह्यात सध्या दररोज दहा ते पंधरा हजार लोकांचे लसीकरण होत आहे. काही दिवशी हा आकडा पाच ते सात हजारांपर्यंत येतो. जशी लस उपलब्ध होत आहे त्याचे लगेच वाटप होऊन लसीकरण मोहीम सुरू आहे. फक्त नागरिकांनी केंद्रावर गर्दी न करता शिस्तीत, सोशल डिस्टंसिंग पाळून लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
---------------
लसीकरण झालेल्या लोकांमधून चांगला फीडबॅक येत आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. क्वचित एखादा बाधित झाला तरी त्यामध्ये गंभीर लक्षणे आढळत नाहीत, ही समाधानाची बाब आहे.
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी