नाकाबंदीदरम्यान ३० लाखांची ६० किलो चांदी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:21 IST2021-04-20T04:21:22+5:302021-04-20T04:21:22+5:30
कोपरगाव : मनमाड - नगर महामार्गावरून कोपरगावहून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या कारची (क्र. एमएच १८ एजे ९०२०) शहरातील साईबाबा कॉर्नर ...

नाकाबंदीदरम्यान ३० लाखांची ६० किलो चांदी पकडली
कोपरगाव : मनमाड - नगर महामार्गावरून कोपरगावहून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या कारची (क्र. एमएच १८ एजे ९०२०) शहरातील साईबाबा कॉर्नर येथे नाकाबंदी दरम्यान शनिवारी (दि. १७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी झडती घेतली. या झडतीत गाडीच्या डिक्कीत पांढऱ्या गोणीत सुमारे ३० लाख रुपये किमतीचे बेहिशोबी ६० किलो ४६३ ग्रॅम चांदीचे ठोकळे पोलिसांना आढळून आले.
या कारवाईत चांदीसह ५ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ३५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील राजगुरूनगर हुपरी येथील व्यापारी सौरभ अनिल पाटील (वय २६) याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोपरगाव शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. याच दरम्यान शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील राजगुरूनगर हुपरी येथील सौरभ अनिल पाटील हा शिर्डीकडे जात असताना साईबाबा कॉर्नर येथे पोलिसांनी तोंडाला मास्क लावलेला नसल्याने दंडात्मक कारवाईसाठी पाटील यांची गाडी थांबविली. त्याला काही विचारण्याच्या आताच त्याने मी हार्डवेअर दुकानदार असून, गाडीमध्ये काहीही नसल्याचे सांगितले. त्याचवेळी पोलीस निरीक्षक देसले याचा संशय बळावला, त्यांनी सहाय्यक फौजदार बबन साठे, पोलीस नाईक राम खारतोडे, प्रकाश नवाळी, सुरज अग्रवाल, गृहरक्षक दलाचे जवान अमोल थोरात या पथकाला गाडीची झडती घेण्यास सांगितले. पोलिसांनी झडती घेतली असता, गाडीच्या पाठीमागील सीटला चेन असून, तो भाग फुगीर दिसला. अधिक तपासणी केली असता आतमध्ये एक चोर कप्पा बसवलेला होता. त्यात एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये चांदीसदृश ठोकळे दिसले. याची खातरजमा करण्यासाठी विचारल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर खरेदीची कोणतीही कागदपत्र त्याच्याकडे मिळून न आल्याने पोलिसांनी चांदीसह कार जप्त केली. दरम्यान, कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून व्यापारी सौरभ पाटील यास नोटीस बजावून सोडून देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.