दूध संघ सुप्यात लवकरच उभारणार व्यापारी संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:56+5:302021-06-24T04:15:56+5:30

सुपा : पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची सुपा येथील पारनेर रस्त्यावरील शहजापूर चौकात लवकरच व्यापारी संकुल ...

Dudh Sangh will soon set up a commercial complex in Supa | दूध संघ सुप्यात लवकरच उभारणार व्यापारी संकुल

दूध संघ सुप्यात लवकरच उभारणार व्यापारी संकुल

सुपा : पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची सुपा येथील पारनेर रस्त्यावरील शहजापूर चौकात लवकरच व्यापारी संकुल उभारणार असून दूध संकलन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य संभाजी रोहोकले व सुरेश थोरात यांनी सांगितले.

जिल्हा सहकारी दूध संघाचे विभाजन झाल्यावर सुपा येथे तालुका सहकारी दूध संघ कार्यान्वित झाला. चौकातच संघाच्या जवळपास २ एकर क्षेत्रावर कार्यालय, संकलन केंद्र असून समोर मोठी जागा आहे. या मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल उभे करून त्याच्या माध्यमातून संघाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. नुकत्याच झालेल्या संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निर्णयास मंजुरी मिळाली. सध्या संघाकडे ३ हजार लिटर दूध प्रतिदिन संकलन केले जाते. त्यात वाढ होणे गरजेचे आहे. इतर खासगी दूध शीतकरण केंद्रापेक्षा प्रतिलिटर १ रूपया जादा बाजारभाव दिला जातो. खासगी संघ २२ ते २२.५० रूपये बाजारभाव देतात, तर सहकारी दूध संघ २३.५० रूपये प्रतिलिटर भाव देत असल्याचे रोहोकले यांनी सांगितले.

जिल्हा दूध संघाच्या विभाजन नंतर तालुका दूध संघात १०६ संस्थांना सभासदत्व दिले होते. त्यापैकी आजमितीस ७६ संस्था सभासद असल्या तरी त्यात अवघ्या १० संस्था संघाला दूध घालतात. ६६ संस्थांचे दूध नेमके जाते कुठे हा संशोधनाचा विषय आहे. यातील प्रत्येक संस्थेने संघाला २ हजार लिटर दूध घातले तर दररोज १ लाख १५ हजार लिटर दूध संघाकडे संकलित होऊन तितक्याच वेगाने संघ उर्जितावस्थेत येऊ शकेल. लवकरच संघाच्या नारायणगव्हाण येथील प्लॅटमध्ये व ढवळपुरी फाट्यावर असणाऱ्या संघाच्या जागेवर दूध संकलन सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचे संचालक संभाजी रोहोकले व सुरेश थोरात यांनी सांगितले.

संघाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब पठारे यांचे नुकतेच निधन झाले. संघाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून त्यांची सतत धडपड सुरू होती.

----

राजकारणाचे जोडे बाहेर सोडले तरच सहकारातून विकास करता येईल. त्यामुळे दूध संघाचा व शेतकऱ्यांच्या हिताचाच सर्वांनी विचार केला पाहिजे.

निलेश लंके,

सदस्य, नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघ

Web Title: Dudh Sangh will soon set up a commercial complex in Supa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.