शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा चालकानेच केला बनाव; घारगाव पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास

By सुदाम देशमुख | Updated: February 26, 2025 10:49 IST2025-02-26T10:48:14+5:302025-02-26T10:49:30+5:30

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Driver faked robbery of agricultural chemicals truck; Ghargaon police investigating crime | शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा चालकानेच केला बनाव; घारगाव पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास

शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा चालकानेच केला बनाव; घारगाव पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास

घारगाव (जि. अहिल्यानगर): शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा बनाव ट्रक चालकानेच केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. संबंधित चालकाने आळेफाटा (जि. पुणे) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्यात हद्दीतील असल्याने गुन्हा घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी तपास केला असता फिर्यादी ट्रकचालक यातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले असून त्यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दीपक किसन कदम (वय : ४२, रा. राजगुरूनगर वाडा, ता. खेड. जि. पुणे) असे ट्रक चालकाचे तर तेजस प्रकाश कहाणे (वय : २१, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे), साईदास रघुनाथ गाडेकर (वय : २७, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. निमगाव निघोज, ता. राहाता. जि. अहिल्यानगर) आणि नवनाथ दादाभाऊ शिंदे (वय : २८, रा. रोहकल, चाकण, ता. खेड. जि. पुणे) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. त्यांनी मिळून ५ लाख ७२ हजार २१४ रुपये किंमतीची शेतीची औषधे लंपास केली होती. ही घटना ३१ जोनवारीला पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर माहुली घाटात घडली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांसह पोलिस हेड कॉन्स्टेबल एकनाथ खाडे, पोलिस कॉन्स्टेबल चांगदेव नेहे तपासाची चक्रे फिरवली. वरील चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दाभाडे हे करीत आहेत.

असा रचला ‘त्यांनी’ बनाव

ट्रकचालक दीपक कदम हा शेतीची औषधे भरलेली ट्रक घेऊन पुण्याहून नाशिकला जात होता. चाळकवाडी टोलनाका येथून त्याने दोन प्रवासी बसविले, ही ट्रक माहुली घाटात आली असता त्यातील एका प्रवाशाला बाथरूमला लागल्याने त्याने गाडी थांबवली. त्यावेळी ट्रकमधील दुसऱ्या व्यक्तीने कदम याच्या डोक्याला गावठी कट्टा लावला. त्यावेळी दुसरा व्यक्ती ड्रायव्हर बाजूने ट्रकमध्ये चढला. त्याने कदम याच्या नाकाला रूमाल लावला अन् तो बेशुद्ध झाला. सकाळी ७.३० वाजता शुद्धीवर आल्यानंतर गाडीत औषधी नव्हती. असा बनाव ट्रकचालक कदम आणि त्याच्या साथीदारांनी रचला होता. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.

Web Title: Driver faked robbery of agricultural chemicals truck; Ghargaon police investigating crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.