आरक्षण नको, उद्योगाला भांडवल द्या
By Admin | Updated: July 21, 2014 00:28 IST2014-07-20T23:53:44+5:302014-07-21T00:28:56+5:30
पारनेर : आरक्षण आधीच ७३ टक्क्यांंपर्यंत गेले असल्याने आम्हाला आरक्षण नको तर ब्राम्हण समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी स्वतंत्र महामंडळ करून आर्थिक भांडवल कर्ज रूपाने द्यावे,

आरक्षण नको, उद्योगाला भांडवल द्या
पारनेर : आरक्षण आधीच ७३ टक्क्यांंपर्यंत गेले असल्याने आम्हाला आरक्षण नको तर ब्राम्हण समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी स्वतंत्र महामंडळ करून आर्थिक भांडवल कर्ज रूपाने द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष निळकंठ देशमुख व जिल्हाध्यक्ष मधुसुदन मुळे यांनी केली.
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सुपा रविवारी आयोजित तालुका मेळाव्यात ते ते बोलत होते. निळकंठ देशमुख म्हणाले, ब्राम्हण समाजाचा सध्या झालेल्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु आता यामध्ये नव्याने कोणाचा समावेश होऊ नये. कारण आरक्षण ७३ टक्क्यांंपर्यंत गेले असून त्याचा इतरांना फायदा होणार नाही.
जिल्हाध्यक्ष मुळे म्हणाले, ब्राम्हण समाज अनेक जण उच्चवर्णीय समजत असले तरी ग्रामीण भागासह अनेक भागात ब्राम्हण आर्थिकदृष्टया मागासलेला व केवळ भिक्षुकीवर अवलंबून आहे. मग त्यांना आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणार नसेल तर उद्योगांना आर्थिक भांडवल उपलब्ध करून द्यावे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ.सुनील गंधे म्हणाले, आमचा आरक्षणापेक्षा आमच्या समाजातील गुणवत्तेवर विश्वास असून त्यासाठी स्वत:च्या गुणवत्तेवर व्यवसाय उभारण्यासाठी प्राधान्य द्यावे.
यावेळी अर्पिता पोळ, वैष्णवी जोशी, प्रियंका क्षीरसागर, गौरी देशपांडे, सी.ए.अनिरूध्द महाजन, अतुल कुलकर्णी, मानसी भालेराव, ऋषिकेश कलवडे, प्रियंका ठोंबरे या गुणवंतांचा महासंघाच्यावतीने गौरव करण्यात आला. मेळाव्यास विलास काळे, जिल्हा महासचिव डी.एस.कुलकर्णी,सुनील कुलकर्णी, कन्हैय्या व्यास, चंद्रकांत महाजन, तालुकाध्यक्ष शशिकांत जोजार, उपाध्यक्ष गणेश कुलकर्णी, सचिन बडवे, पोपट देशपांडे, विवेक काळे, शामराव काळे तसेच महिला हजर होत्या. महेश पोळ यांनी वेदमंत्र पठण तर सुरेश क्षीरसागर यांनी सूत्रसंचलन केले. (तालुका प्रतिनिधी)