जिल्हाध्यक्ष निवडीवरुन गोंधळ

By Admin | Updated: July 28, 2014 00:51 IST2014-07-27T23:13:16+5:302014-07-28T00:51:16+5:30

पाथर्डी : नगर जिल्ह्यातील अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या व जिल्हा ऐक्य मंडळ या प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेत जिल्हाध्यक्ष निवडीवरुन गोंधळ झाला़

The district president was elected as the Chief Minister | जिल्हाध्यक्ष निवडीवरुन गोंधळ

जिल्हाध्यक्ष निवडीवरुन गोंधळ

पाथर्डी : नगर जिल्ह्यातील अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या व जिल्हा ऐक्य मंडळ या प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेत जिल्हाध्यक्ष निवडीवरुन गोंधळ झाला़ जिल्हाध्यक्षाच्या नावावर ‘ऐक्य’ न झाल्याने दोन्ही संघटनांमध्ये फूट पडली. ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय काकडे यांच्या समर्थनार्थ शिक्षकांनी राजीनामे देऊन समांतर संघटना सुरु केली़
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व जिल्हा ऐक्य मंडळ या संघटनेचा मेळावा रविवारी (दि़२७) पाथर्डी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झाला़ या मेळाव्याला राज्य संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश भावसार, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, नेते सर्जेराव राऊत, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय काकडे, संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निमसे, दादाभाऊ कोल्हे, अंबादास काकडे, ज्ञानदेव कराड, विष्णुपंत बांगर, भिमराव फुंदे, शरद वांढेकर, रामदास भापकर, लक्ष्मण चेमटे आदींसह शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.
ऐक्य मंडळाचे अध्यक्ष विजय काकडे यांनी शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आपली निवड करावी, अशी मागणी केली. त्यास अंबादास काकडे, दादाभाऊ कोल्हे (पारनेर), रामदस भापकर (श्रींगोदा), गणेश पाडवी (कोपरगाव) यांच्यासह इतर तालुक्यातील संघटना पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.
दरम्यान राज्य संघाचे माजी अध्यक्ष सुरेश भावसार यांनी जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र निमसे व ऐक्य मंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब कदम (राहुरी) यांची निवड जाहीर केली. या निवडीने विजय काकडे यांचे समर्थक नाराज झाले व त्यांनी या निवडीचा निषेध केला.भावसार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या़ भावसार व भापकर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अध्यक्ष निवडीत विश्वासात न घेतल्याचा आरोप करीत काकडे समर्थक युवराज हिलाळ, आर. जी. ठुबे, शिवाजी कदम, राजू गायकवाड, संतोष जाधव, म्हाळु नरसाळे, बाळासाहेब साबळे, प्रकाश ठुबे, संभाजी शिंदे, प्रदीप पोटघन यांच्यासह शिक्षकांनी मेळाव्यातून काढता पाय घेतला़ आणि मोहटादेवी गडावर जाऊन ऐक्य मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा विजय काकडे यांची एकमताने निवड केली. (प्रतिनिधी)
ऐक्य मंडळाची माझ्या अध्यक्षतेखाली अधिकृत नोंदणी झाली आहे़ पाथर्डीतील जिल्हाध्यक्ष निवड बेकायदेशीर आहे. आम्ही आठवडाभरात जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करणार आहोत. राजेंद्र निमसे यांनी अस्तित्वात नसलेल्या कार्यकारिणीचे खोटे अर्ज भरुन बिगर लोकशाही पध्दतीने स्व:ताची निवड करुन घेतली.
-विजय काकडे
विजय काकडे यांना जिल्ह्यातील नऊ तालुक्यांनी विरोध केला होता़ त्यामुळे त्यांची निवड झाली नाही़ संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र निमसे व ऐक्य मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब कदम यांची निवड करण्यात आली. त्यामुळे काकडे नाराज झाले.
-राजेंद्र निमसे
आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुका घेतल्या़ आमच्याकडे सर्व पदाधिकाऱ्यांचे लेखी आहे. त्यांना राज्य संघाचा पाठिंबा नसल्याने काकडे यांना पद मिळू शकले नाही.
-सुरेश भावसार,
माजी राज्याध्यक्ष,
शिक्षक संघ

Web Title: The district president was elected as the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.