जिल्हा बँकेत कोल्हे, काळेंची परंपरा कायम ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:40+5:302021-03-21T04:20:40+5:30
कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे व स्व.शंकरराव काळे यांनी जिल्हा बँकेत काम करताना राजकीय जोडे बाजूला ठेवून बँकेचे ...

जिल्हा बँकेत कोल्हे, काळेंची परंपरा कायम ठेवणार
कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे व स्व.शंकरराव काळे यांनी जिल्हा बँकेत काम करताना राजकीय जोडे बाजूला ठेवून बँकेचे हीत जपण्याचे काम केले आहे. तीच परंपरा यापुढेही जपण्यास आम्ही कटिबध्द आहोत. संचालक म्हणून नव्हे तर सेवकाच्या भूमिकेतून बॅँकेसाठी काम करणार आहे. त्यामुळे ३१ मार्चअखेर वसुलीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
कोपरगाव येथील जिल्हा बॅँकेच्या सभागृहात विविध सोसायटी व शाखांची आढावा बैठक शुक्रवारी (दि.१९) पार पडली. त्याप्रसंगी कोल्हे बोलत होते. या बैठकीसाठी तालुका विकास अधिकारी कैलास गवळी, वसुली अधिकारी अशोक लोहकरे, मुख्य कार्यालयाचे शेती कर्ज विभागाचे एस. एम. पवार, सहकार अधिकारी राजेंद्र रहाणे, नोडल अधिकारी एस. ए. शिंदे आदीसह विविध विकास सेवा सोसायटीचे सचिव, शाखाधिकारी, निरीक्षक यावेळी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा बॅँकेचे संचालकपदी निवड झाल्याबददल विवेक कोल्हे कोपरगाव जिल्हा बँक व सचिव संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कोल्हे म्हणाले, या संस्थेवर अनेक शेतकऱ्यांची कुटुंबे अवलंबून आहे. त्यामुळे बॅँकेचे हीत जोपासण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विकास सोसायटी संस्था सक्षम झाल्या तर जिल्हा बॅँक सक्षम होईल. त्यामुळे सोसायट्यांनी नफा वाढविण्याच्या दृष्टीने व्यवसाय निवडावे. जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील शाखांची परिस्थिती निश्चितच चांगली आहे, असेही कोल्हे म्हणाले.