उद्धव ठाकरे यांचे दिशादर्शक नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:43+5:302021-07-14T04:23:43+5:30
अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे दिशादर्शक नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे. या नेतृत्वाचा उपयोग शिवसैनिकांच्या व शिवसेनेच्या बळकटीसाठी ...

उद्धव ठाकरे यांचे दिशादर्शक नेतृत्व
अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे दिशादर्शक नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे. या नेतृत्वाचा उपयोग शिवसैनिकांच्या व शिवसेनेच्या बळकटीसाठी करायचा आहे. नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी नि:संकोचपणे माझ्याशी संपर्क करावा. मी नेहमी शिवसेना व शिवसैनिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
मंत्री गडाख यांनी संगमनेर, अकोला, राहता, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यात शिवसंपर्क अभियानानिमित्त दौरा करून, प्रत्येक तालुक्यात जाऊन पदाधिकारी, शिवसैनिक व जनतेबरोबर सवांद साधला. यावेळी मंत्री गडाख यांच्यासोबत खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व प्रत्येक तालुक्यातील तालुकाप्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार १२ जुलै ते २४ जुलैदरम्यान शिवसेनेचे राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान सुरू आहे. गावागावातील शिवसैनिकांना बळ देणे, शिवसेनेचा शाखा विस्तार करणे, सदैव कार्यरत असलेल्या शिवसैनिकांच्या समस्या सोडविणे, पक्ष संघटन बळकट करणे आदी या शिवसंपर्क अभियानाचे उद्दिष्ट आहे.
मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली १२ जुलै रोजी अकोले, संगमनेर, राहाता येथे शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली. पाऊस असूनही अकोले, संगमनेर या तालुक्यात महिला, तरुण, ज्येष्ठ शिवसैनिकांची लक्षणीय उपस्थिती होती. शिवसंपर्क अभियानप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना गडाख पुढे म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. शिवसैनिकांनी सामान्य जनतेच्या मदतीला धावून गेले पाहिजे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे विचार सामान्य जनतेत पोहोचविले पाहिजेत.
शिवसेनेच्या सभासद नोंदणीची मंत्री गडाख यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली, तसेच खा.सदाशिव लोखंडे यांनीही शिवसंवाद अभियानाची माहिती दिली.
१३ जुलै रोजी कोपरगाव व श्रीरामपूर येथेही शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. कोपरगाव व श्रीरामपूर येथेही शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शिवसंपर्क अभियानामुळे गावागावात शिवसेनेच्या शाखांना बळकटी मिळणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
--------
फोटो- १३ शंकरराव गडाख