देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील-राधाकृष्ण विखे; युतीतील बंडखोरी ‘इनकमिंग’मुळे नसल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 11:58 IST2019-10-18T11:55:04+5:302019-10-18T11:58:02+5:30
महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येणार आणि मुख्यमंत्री देखील भाजपचाच होणार. देवेंद्र फडणवीस हेच त्या पदावर असतील असेही ठरले आहे. आता चर्चा फक्त उपमुख्यमंत्री पदाची आहे, असे सांगत गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरचा शिवसेनेचा दावा खोडून काढला आहे. तसेच भाजप, शिवसेनेत मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी ‘इनकमिंग’मुळे नाही, असा दावाही त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील-राधाकृष्ण विखे; युतीतील बंडखोरी ‘इनकमिंग’मुळे नसल्याचा दावा
लोकमत मुलाखत - अतुल कुलकर्णी ।
बाभळेश्वर (शिर्डी) : महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येणार आणि मुख्यमंत्री देखील भाजपचाच होणार. देवेंद्र फडणवीस हेच त्या पदावर असतील असेही ठरले आहे. आता चर्चा फक्त उपमुख्यमंत्रीपदाची आहे, असे सांगत गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरचा शिवसेनेचा दावा खोडून काढला आहे. तसेच भाजप, शिवसेनेत मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी ‘इनकमिंग’मुळे नाही, असा दावाही त्यांनी केला.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील कॉँग्रेस सोडून शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या असलेल्या भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारानंतर ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तीन महिन्यापूर्वी मंत्रिमंडळ फेरबदल करताना उपमुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याविषयी चर्चा झाली होती़ तेव्हा निवडणुकीनंतर पाहू, असे म्हणत शिवसेनेने त्याला नकार दिला होता. त्यामुळे हा काही मुद्दा फार चर्चेला उरला नाही, असेही विखे पाटील म्हणाले. त्यांच्याशी झालेली ही बातचीत.
प्रश्न : शरद पवार यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचा संताप राज्यभर दिसत आहे. विशेषत: मराठा समाजाच्या तरूणांमध्ये तो जास्त दिसतो आहे, यावर तुम्ही काय सांगाल?
उत्तर : मला असे वाटत नाही. कायदेशीर प्रक्रिया चालत असते़ त्यातून अशा गोष्टी घडतात. त्यामुळे लगेच मराठा समाज एकवटतो, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. अनेकांवर कारवाया झाल्या आहेत. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना नोटीस आली असेल. मात्र, संपूर्ण प्रकरण मला माहित नाही. परंतु मराठा आरक्षणासाठी फक्त आश्वासने मिळाली होती. आरक्षण देण्याचे काम भाजप सरकारने केले.
प्रश्न : भाजप, शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. ‘इनकमिंग’मुळे ही बंडखोरी झाली आहे का?
उत्तर : असे बिलकूल झालेले नाही. ज्या ठिकाणी भाजपच्या जागा शिवसेनेला आणि शिवसेनेच्या जागा भाजपला सोडल्या गेल्या, त्याठिकाणी बंडखोरी झाल्याचे दिसते. मात्र, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून जे लोक भाजपत गेले, तेथे मात्र बंडखोरीची टक्केवारी कमी आहे. भाजप, सेनेच्या मूळ मतदारसंघात ही बंडखोरी दिसून येत आहे. निवडणुकीच्या काळात प्रत्येकाला उमेदवारी मिळावी, असे वाटत असते़ हे स्वाभाविक आहे.
प्रश्न : शिवसेनेने दहा रूपयात जेवण, एक रूपयात आरोग्यतपासणी अशी घोषणा भाजपला न विचारता केली आहे. ते तुम्हाला योग्य वाटते का?
उत्तर : महायुतीतल्या एका पक्षाच्या नेत्याने त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. निवडणुकीनंतर जेव्हा आमचे सरकार येईल, तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून यावर निर्णय घेतील आणि प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी संवादातून मार्ग काढतील.
प्रश्न : तुम्ही विरोधात असताना राज्यात निर्माण झालेल्या बेरोजगारी, आर्थिक मंदीवर सतत बोलत होता. आजही तुमची तीच भूमिका कायम आहे का?
उत्तर : अमेरिका, युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, आपल्याकडे या मंदीचे फार अनिष्ट परिणाम होतील असे वाटत नाही. राज्यात उद्योगांवर निश्चित परिणाम झाला आहे. गाड्यांची विक्री कमी झाली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी मोठे पॅकेज दिले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. मंदीची लाट तात्पुरती आहे. अन्न सुरक्षेच्या बाबतीत आपण कितीतरी पुढे आहोत.
प्रश्न : भाजपने त्यांच्या अनेक नेत्यांना तिकिटे नाकारली. एक प्रकारे नव्याने इनकमिंग झालेल्यांना हा इशारा आहे, असे वाटत नाही का?
उत्तर : एकदा आपण पक्षाची भूमिका मान्य केली की, त्यावर आपण भाष्य करणे योग्य नाही. मी आता भाजपमध्ये आहे. पक्षाची जी भूमिका आहे. तीच माझी आहे. एकनाथ खडसे यांना का वगळले यांचे उत्तर मी देऊ शकत नाही.
प्रश्न : बाळासाहेब थोरात यांनी मी बाजीप्रभूंसारखा लढतो आहे, असे विधान केले आहे. त्यावर आपण काय सांगाल?
उत्तर : बाजीप्रभू देशपांडे स्वराज्याकरीता लढले. बाळासाहेब थोरात आणि ती मंडळी सत्तेसाठी लढत आहेत. बाळासाहेबांनी इतिहासाचे नीट वाचन केलेले दिसत नाही. शिवाजी महाराज गडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी खिंड लढविली़ त्यात ते धारातिर्थी पडले. त्यांना स्वराज्याचे संरक्षण करायचे होते. बाळासाहेबांना स्वत:च्या सत्तेसाठी खिंड लढवायची आहे. त्यांच्याच तालुक्यात त्यांना नाकीनऊ आले आहेत.
प्रश्न : नगर जिल्ह्यात सगळ्या जागा जिंकण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर दिली आहे. त्यात अपयश आले तर ती जबाबदारी कुणाची?
उत्तर : पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली त्यात यश, अपयश दोन्हीची जबाबदारी आपल्यालाच स्वीकारावी लागेल. लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही निवडून आणल्या. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. तोच पुन्हा एकदा सिद्ध होईल.
प्रश्न : सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादीने जागा सोडली असती तर आज वेगळे चित्र राहिले असते का?
उत्तर : आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मी स्वत: शरद पवार यांना यासाठी तीन वेळा भेटलो होतो. शेवटच्या भेटीत त्यांनी मला नगर जिल्ह्यातील कार्यकर्ते ऐकत नाहीत, असे उत्तर दिले़ त्यानंतर माझ्याजवळ दुसरा मार्ग राहिला नाही. आमच्या वडिलांविषयी त्यांच्या मनात राग होता. मात्र, त्यांना जाऊन दोन वर्ष झाली. माझ्याबद्दल काही राग आहे का? असेही मी त्यांना विचारले होते. त्यावर त्यांनीही तुमच्याविषयी राग नाही, असे सांगितले. पण त्यावेळी मी जो निर्णय घेतला तो योग्य होता, असे आता मला वाटते. मी त्याबद्दल पूर्ण समाधानी आहे.
प्रश्न : बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आपल्या पत्नी शालिनीताई विखे यांना उभे करणार अशी चर्चा होती. त्याचे पुढे काय झाले, तुम्ही का माघार घेतली?
उत्तर : अशी चर्चा माध्यमांमधूनच होती. कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शेवटी आपण आपल्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत.