"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 14:51 IST2024-09-27T14:46:40+5:302024-09-27T14:51:54+5:30
Devendra Fadnavis : आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.

"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
प्रशांत शिंदे
अहमदनगर - विरोधी पक्षाचे नेते सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार आहेत. एक नेते म्हणाले, पंधराशे रुपयांत काय होतं पण तुम्ही चाळीस वर्षे राज्य केलं. फुटकी कवडी तरी बहिणींना दिली का? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना पंधराशे रुपयांचे मोल समजू शकत नाही. खबरदार, आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.
शिर्डीत 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' लाभार्थी सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार अशुतोष काळे, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.
ते पुढं म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते उभा राहून म्हणायचे फसवणूक केली जातीय, पैसे देता येणार नाही, पैसे पोहोचणार नाही, हे खोटं बोलत आहेत, ही लाच आहे. परंतु आज राज्यातील एक कोटी ९० लाख महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर केली.
तुम्हाला तुमच्या काही सावत्र भावांपासून सावध करायचे आहे. आम्ही योजना सुरु केल्यानंतर काही सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले. त्यांनी कोर्टात सांगितले की लाडकी बहिणी योजना, मोफत शिक्षण योजना, पिंक रिक्षा योजना, मोफत सिलिंडरची योजना, अशा योजनांमुळे पैशांचा चुराडा होतो आहे. त्यामुळे या सगळ्या योजना स्थगीत करा, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केला.
ते पुढं म्हणाले, आम्ही मोठा वकील उभा केला आणि योजनांवर स्थगिती येऊ दिली नाही. पण सावत्र भावांची नियत बघा. कालपरवा आदित्य ठाकरे म्हणाले, आमचे सरकार येऊ द्या, महायुतीच्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय आम्ही रद्द करुन टाकू. म्हणजे यांच्या डोक्यात सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करायाचा विचार आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे म्हणाल्या लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींना दिलेली लाच आहे. अरे काही बोलताना शरम करा. हा पैसा कोणाच्या बापाचा पैसा नाही, सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे. त्यांचेच पैसे आम्ही बहिणींच्या खात्यात टाकतोय तर आमच्या बहिणींना लाचखोर म्हणायचा अधिकार आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.