शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:35 IST2018-02-26T12:33:34+5:302018-02-26T13:35:59+5:30
श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली असून, उपमहापौर पदाचाही राजीनामा घेण्यात आला आहे. छिंदम सध्या नाशिक येथे कोठडीत आहे. छिंदम याचे नगरसेवकपदही रद्द करावे, असा ठराव सोमवारी महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव
अहमदनगर : अहमदनगर महापानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली असून, उपमहापौर पदाचाही राजीनामा घेण्यात आला आहे. छिंदम सध्या नाशिक येथे कोठडीत आहे. छिंदम याचे नगरसेवकपदही रद्द करावे, असा ठराव सोमवारी महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला.
शिवजयंतीच्या तीन दिवस अगोदर म्हणजे १६ फेबुवारी रोजी भाजपच्या श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल व शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्त्तव्य केले होते. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले़ त्यानंतर छिंदम याला पक्षातून काढून टाकण्यात आले. तसेच उपमहापौर पदाचाही राजीनामा घेण्यात आला. छिंदमला १६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. सध्या तो नाशिक येथील कारागृहात आहे.
छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी विविध संघटनांच्यावतीने करण्यात आली होती. त्यामुळे छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी महापालिकेने सोमवारी विशेष सभा घेतली. हात वर करुन ठराव मंजूर करण्यात आला. सभेला नगरसेवक गणेश कवडे, दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, कुमार वाकळे, संपत बारस्कर, बाबासाहेब वाकळे, सुवेंद्र गांधी, सुवर्णा कोतकर, मनिषा काळे, दत्ता कावरे, दीप चव्हाण आदी उपस्थित होते.
या सभेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे वस्त्र परिधान करुन सभेत छिंदम याचा जोरदार निषेध केला. छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी सर्वांनी सभेत केली. त्याचवेळी महापालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुतळा बसविण्यासाठी नगरसेवकांनी एका वर्षाचे मानधन देण्याची तयारी दर्शविली.
छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा
छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने सभागृहात करण्यात आली. तर छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन आमदार झालेले छिंदमच्या प्रकरणावर गप्प का, असा सवाल नगरसेवक योगीराज गाडेंनी करीत भाजपावर टीका केली.