श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून ९ मेपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणी नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यास कुकडीचे पाणी मिळण्यास जून महिना उजाडणार आहे. त्यामुळे तालुक्यातील फळबागधारक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
कुकडी प्रकल्पातील पाण्याचे नियोजन आणि राजकारण यामुळे आवर्तन सुटण्यास तब्बल महिनाभर उशीर झाला. अशा परिस्थितीत या आवर्तनाची आस शेतकऱ्यांना आहे. कुकडीच्या आवर्तनासाठी साडेतीन टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना १.८ टीएमसीच पाणी मिळणार आहे. इतर पाण्याची जलसंपदा विभागाने गळती धरली आहे. कालवा गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हा चिंतेचा विषय असून गळतीचे प्रमाण का वाढत आहे, यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.
करमाळा तालुक्यास आठ दिवसांत ०.३७६ टीएमसी, कर्जत तालुक्यास अकरा दिवसांत ०.५६० टीएमसी, श्रीगोंदा तालुक्यास साडे सात दिवसांत ०.६१५ टीएमसी, तर पारनेर तालुक्यास अडीच दिवसात ०.२५० टीएमसी पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. हे पाणी फळबागांना प्राधान्याने देणे आवश्यक आहे. जर गावोगावचे तलाव भरण्याची यादी पुढे आली, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे आवर्तन मृगजळच ठरू शकते ही वस्तुस्थिती आहे.
---
आवर्तन कालावधीत बंदोबस्त..
सध्या कोरोना महामारीची जमावबंदी आदेश १४ मेपर्यंत आहेत. हे आदेश ३१ मे पर्यंत वाढण्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे कालव्यावर शेतकऱ्यांना एकत्र येण्यास मनाई हुकूम राहणार आहे. पाण्याची तीव्रता पाहता आवर्तन कालावधीत पोलीस बंदोबस्त ठेवण्याची वेळ पोलिसांवर येण्याची शक्यता आहे.