दत्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
By Admin | Updated: July 13, 2014 00:18 IST2014-07-12T23:35:08+5:302014-07-13T00:18:07+5:30
अहमदनगर : गुरुपौर्णिमेनिमित्त शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये भाविकांनी भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी शनिवारी गर्दी केली़
दत्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
अहमदनगर : गुरुपौर्णिमेनिमित्त शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये भाविकांनी भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी शनिवारी गर्दी केली़ सावेडीतील वेदांतनगरमधील श्री दत्तक्षेत्र येथे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या़ राज्यासह अहमदाबाद व अमेरिकेतून भाविक नगरमध्ये दाखल झाले़
दत्तक्षेत्रमधील भगवान दत्तात्रयांचे मंदिर, सद्गुरु रामकृष्ण महाराज क्षीरसागर यांचे अधिष्ठान व मंदिर परिसरातील भाग केळीच्या खुंटांनी, रंगीबेरंगी फुलांच्या हारांनी, रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते़ दर्शनासाठी स्त्री व पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली होती़ सद्गुरुंनी वापरलेले साहित्य व खोली पाहण्यासाठी दत्तात्रयांच्या दर्शनानंतर भाविकांनी स्मृती संग्रहालयात गर्दी केली़
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दत्त देवस्थानच्या प्रकाशन समितीच्या वतीने वाटचाल शिष्यत्वाकडे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले़ अथर्व वेदाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या किरण अरुण गोसावी व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या रितेश जीवन कुलकर्णी यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले़
दत्तात्रयांचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक नगरमध्ये दाखल झाले होते़ महाराष्ट्र, अहमदाबाद व अमेरिका येथूनही आलेल्या २२ सत्संग मंडळांच्या सभासदांनी पाद्यपूजा सोहळ्यात सहभाग घेतला़ प्रोफेसर कॉलनी रस्ता वाहनांनी व गर्दीने सकाळपासूनच फुलून गेला होता़
जिल्हाभरातील दत्तमंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली़
(प्रतिनिधी)
सेनेच्यावतीने आरोग्य शिबिर
गुरुपौर्णिमेनिमित्त व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ नगर शहर शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य चिकित्सा, नेत्र तपासणी, चष्मा व औषध वाटप शिबिराचे उद्घाटन माळीवाडा येथे आ़ अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले़
यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, नगरसेविका सुरेखा कदम, नगरसेवक संजय शेंडगे, विक्रम राठोड, छबु जाधव, दीपक खैरे, अनिल शिंदे, अनिल लोखंडे आदी उपस्थित होते़